औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील एकाही वाॅर्डात पिण्याचे पाणी नसल्याने रुग्णांसह, नातेवाईकांना पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मानसोपचार विभागाच्या वाॅर्ड ७ मध्ये एसी बंद असून तेथे फॅनही नसल्याने रुग्ण, नातेवाईंकांना वाॅर्डासमोरील झाडाखाली आसरा घ्यावा लागत आहे. रुग्णालय प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेण्यात धन्यता मानत आहे.
मृत्यूच्या दाढेतून रुग्णांना बाहेर काढण्याचा घाटी रुग्णालयाचा लौकिक मराठवाडा, विदर्भ, खान्देशासह आजूबाजूच्या जिल्ह्यात आहे. मात्र, अलिकडे आंतर रुग्णसेवेकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे घाटी प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. घाटी रुग्णालय परिसरात ७ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून ७ संपवेलही आहेत. त्यात मनपाकडून दररोज ३ ते ४ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. मुबलक पाणी असताना वितरणातील दोषामुळे मेडिसीन, सर्जिकल इमारतींच्या वाॅर्डांतील स्वच्छतागृहात वापरण्यासाठीही पाणी नसल्याने रुग्ण, नातेवाईकांना असुविधेला सामोरे जावे लागत आहे. काही संस्था मोफत जार पुरवतात. तेवढाच काहीसा आधार रुग्ण, नातेवाईकांना आहे.
१८ वाॅटर कुलर आहेत कुठे ?मेडिसीन विभागातील एक वाॅटर कुलर वगळता बहुतांश वाॅटर कुलर, वाॅटर फिल्टर बंद अवस्थेत आहे. पदवी व पदव्युत्तर वसतिगृहांत पिण्याचे पाणी विकतच घ्यावे लागते. ‘मार्ड’कडूनही ५ वाॅटर फिल्टर आणि जुन्या ‘आरओ सिस्टीम’ दुरुस्तीच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे पदव्युत्तर वसतिगृहाचे प्रमुख डाॅ. भारत सोनवणे म्हणाले.
मी सुटीवर प्रभारी अधिष्ठातांशी बोलाप्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे कागीनाळकर या शुक्रवारी अधिष्ठाता कार्यालयात पोहचल्या. त्यावेळी ‘लोकमत’ने असुविधेबाबत प्रतिक्रिया विचारली. तेव्हा आपण सुटीवर आहोत. प्रभारी अधिष्ठातांशी बोला म्हणत, त्या अधिष्ठातांच्या आतील दालनात निघून गेल्या. दुसरीकडे, पदभार असलेल्या अधिष्ठाता डाॅ. मारुती लिंगायत यांनी अधीक्षक कार्यालयाकडे बोट दाखवून हतबलता दर्शवली.
आर्थिक अधिकार डीन, एओंकडेवापरण्याचे पाणी आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. वाॅटर कुलर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. अधीक्षकांकडे आर्थिक अधिकार नसून ते डीन व एओंकडे आहेत. अभ्यागत मंडळातही हा विषय झाला होता. मात्र, एओ सुटीवर होत्या. नेत्ररोग विभागातील ओटी, अधीक्षक कार्यालयातही एसी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. वाॅर्ड ७ मध्ये फॅनची व्यवस्था करू.- डाॅ. काशीनाथ चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय
आरएमओंकडून उद्धट वागणूकमानसोपचार विभागाच्या प्रमुखांनी तीन दिवसापासून पाणी नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात फोन केला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या आरएमओंनी कोण, काय, अशी प्रश्नांची सरबत्ती करत फोन आदळल्याची घटना गुरुवारी घडली. त्यामुळे रुग्णांना वाॅर्डात उपचार द्यावे तरी कसे, असा प्रश्न परिचारिका, तज्ज्ञात निर्माण झाला आहे.
मुलाच्या उपचारासाठी धडपडमुलगा १८ दिवसापासून भरती आहे. वाॅर्डात पाणी नसल्याने रोज पिण्याचे पाणी विकत आणि वापरण्याचे पाणी हातपंपावरून आणतो.-रामभाऊ दाभाडे, नातेवाईक
पाच दिवसापासून मुलगा भरती आहे. गेल्या तीन दिवसापासून पाणी नाही. वाॅर्डात एकही फॅन नसल्याने दिवसभर, अर्धी रात्र वाॅर्डाबाहेरील झाडाखाली बसून काढत आहोत.-सरला भागवत, नातेवाईक