छत्रपती संभाजीनगर :राज्य सरकार शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ येत आहे. तब्बल ७ वर्षांनंतर शहरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. याशिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शहरातील पहिले भव्यदिव्य सभागृह उभारण्यात आले. त्यामुळे याच ठिकाणी मंत्रिमंडळ होणार आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून स्मार्ट सिटी कार्यालयाच्या परिसरात डांबरीकरण, रंगरंगोटी, कार्यालयातील साफसफाईवर भर देण्यात आला होता. या सभागृहात शनिवारी, दुपारी १२ ते ३:३० या वेळेत मंत्रिमंडळ बैठक होईल. सभागृहात १०० व्हीव्हीआयपी बसू शकतील, संपूर्ण सभागृह वातानुकूलित असून, येथे भव्य एलईडी स्क्रीन, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था, खुर्च्या इ. व्यवस्था आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासाठी केबिनची सोय केली.
स्मार्ट सिटी कार्यालयाच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित हाेणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे स्वतंत्र पथक नेमले आहे. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलचे व्हेज जेवण मंत्र्यांसाठी मागविण्यात आले आहे. पंचतारांकित हॉटेलचे कर्मचारी जेवण वाढतील. पनीरच्या भाज्या, पोळी, गुलाबजाम इ. पदार्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्हीव्हीआयपी वाहनांसाठी, कर्मचारी, भोजन व्यवस्था, पार्किंगसाठी आमखास मैदानावर सोय करण्यात आली. पाऊस आला, तरी कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी मनपाने घेतली आहे. याशिवाय बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली शहरातील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. उद्या मराठवाड्यासाठी कोणते पॅकेज जाहीर होते आणि काय-काय सुविधा दिल्या जातात, याकडे तमाम मराठवाडावासीयांचे लक्ष लागले आहे.