- विजय सरवदे
औरंगाबाद : पदवी प्राप्त करणे हा विद्यार्थ्याच्या जीवनातील अत्युच्च आनंद असतो. त्यामुळेच तर पदवीदान समारंभात गाऊन घालून फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडालेली असते. पण यंदा कोरोनामुळे विद्यापीठामार्फत गाऊन देण्याची शक्यता धूसर झाली असून, यावेळी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना गाऊनशिवाय पदवी घ्यावी लागणार आहे.
आता एप्रिल महिनाही लोटला आहे. अन्य विद्यापीठांचे ऑनलाइन दीक्षांत समारंभ होत आहेत. पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या काळात सर्वत्र अस्वस्थता आणि अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे या काळात विद्यार्थी, शिक्षक तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रभावी मार्गदर्शन करू शकेल, अशा प्रमुख पाहुण्यांच्या आम्ही शोधात आहोत. प्रमुख पाहुण्यांचा विषय लवकरच मार्गी लागेल. याशिवाय दीक्षांत समारंभ जूनअखेरपर्यंत घेण्यासाठी राज्यपाल कार्यालयाच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून तारीख मिळाली की लगेच हा समारंभ घेतला जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एप्रिलअखेर दीक्षांत समारंभ घेण्याचा निर्यण झाला होता. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक तथा पद्मविभूषण रघुनाथ माशाळकर, परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर किंवा के. कस्तुरीरंगन या तीन पाहुण्यांपैकी जे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, त्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार परीक्षा विभागाने वैज्ञानिक रघुनाथ माशाळकर यांना दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली; पण त्यांच्याकडून अद्याप संमती मिळालेली नाही, हे विशेष!
चौकट.......
गाऊन परिधान करून पदवी घेण्याची मजाच न्यारी
मागील वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालये, शाळांमध्ये वर्ग बंद झाले असून, ऑनलाइन तासिका सुरू आहेत. त्यामुळे यंदा दीक्षांत समारंभही ऑनलाइनच घेण्याच्या विद्यापीठात जोरदार हालचाली सुरू आहेत. असे असले तरी दीक्षांत समारंभात गाऊन घालून पदवी घेण्याची मजाच न्यारी असते. यंदा मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी गाऊनवर गंडांतर येणार असून, पदवी घेण्याची मजा राहणार नाही, अशा भावना विद्यार्थ्यांच्या आहेत.
चौकट......
पीएच.डी., एम.फिल विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणार
दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फक्त पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांनाच पदवी प्रदान केली जाते. उर्वरित विद्यापीठातील एम.फिल. व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना काऊंटरवर पदवी दिली जाते, तर मागील तीन वर्षांपासून पदवीधारक विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये हा समारंभ घेऊन पदवी वितरित केली जाते. पदव्युत्तर व पदवीधारक विद्यार्थ्यांकडून पदवी घेण्यासाठी प्रवेशाच्या वेळीच अर्ज भरून घेतला जातो, तर पीएच.डी/ व एम.फिलच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा विभागामार्फत लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.