कन्नड तालुक्यातील हतनूर येथे गेल्या काही वर्षांपासून अद्रक पिकाची लागवड वाढली आहे. हतनूर, शिवराई, बहिरगाव, बनशेंद्रा, निमडोंगरी, घुसूर, चिकलठाण, रेल, नावडी ही गावे अद्रक उत्पादनात अग्रेसर आहेत. चांगले उत्पादन व पैसा मिळत असल्याने आधुनिक पद्धतीने आद्रक पीक घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र परिसरात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात अद्रक पिकावर सड व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे नुकसान होत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षांपासून अद्रक पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा मात्र शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत अद्रक लागवड घटवली आहे. मागील वर्षी हजार ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल असा जेमतेम दर मिळाल्याने पिकांवर केलेला खर्चदेखील भरून निघाला नाही. येथील अद्रक परराज्यांत विक्रीसाठी जाते; परंतु पावसामुळे सड व करपा रोगाने थैमान घातले. अद्रक उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट...
अतिवृष्टीने हतनूरसह परिसरात खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याच शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावेत.
दीपक एरंडे, तलाठी
कोट...
अद्रकीत कंद मर किंवा कंद सड आढळून येत आहेत. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खते, औषधे द्यावीत. पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा अतिवापर टाळावा. ज्या ठिकाणी पाणी साठवले जात असेल, तिथे चर खोदून पाणी काढून द्यावे.
गणेश काळे, शेतकरी