औरंगाबाद : मराठवाड्यातील ६७ मंडळांना मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर-धुळे महामार्गावरील औट्रम घाटात ढगफुटी झाल्याने दरड कोसळली तर डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला. त्यामुळे घाटात अनेक वाहने अडकली.
विभागात जरी ६७ मंडळांत अतिवृष्टी झाली असली ऑगस्ट महिन्यातील सरासरीच्या तुलनेत आजवर झालेला पाऊस कमी आहे. १९४ मि.मी.च्या अपेक्षित पावसाच्या सरासरीपैकी १७२ मि.मी. पाऊस झाला आहे. २२ मि.मी. पावसाची तूट सध्या आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी, चांडोळा, खानापूर, मुखेड, कुरुळा, लोहा आणि जांब महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. दोन दिवसांत चौघे वाहून गेल्याच्या घटना नांदेड जिल्ह्यात घडल्या.
जालना जिल्ह्यात तीर्थपुरी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील नळकांडी पूल वाहून गेला. तसेच खालापुरीजवळील बहिरी नदीला पूर आल्याने संपूर्ण वाहतूक बंद होती. जालना जिल्ह्यातील पन्नासाहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. उस्मानाबाद जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात सोमवारी संततधार पाऊस झाल्याने रेणा मध्यम प्रकल्पात ९ तासांत १४ टक्के पाणीसाठा वाढला आहे.
कुठे मुसळधार तर कुठे रिपरिप
विदर्भात मंगळवारी पूर्व विदर्भातील तीन जिल्हे वगळता सर्वदूर पाऊस झाला. कुठे मुसळधार, तर कुठे रिपरिप सुरू आहे. तथापि, अनेक जिल्ह्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोघे वाहून गेल्याचे वृत्त आहे. वर्धा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत पंधरवड्यानंतर पावसाने पुन्हा फेर धरला आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यातील सोनापूरच्या नाल्याला आलेल्या पुरात सतीश मधुकर देठे (४०) आणि राजेंद्र नामदेव उईके (३७) वाहून गेले.
अमरावती जिल्ह्यात २४ तासात १२.५ मिमी पाऊस कोसळला. वर्धा जिल्ह्यात पावसामुळे सर्वच जलाशयांची पाणीपातळी वाढली आहे. अकाेला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात दाेन दिवसांपासून चांगला पाऊस बरसत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत नागपूर जिल्ह्यात ४२.१ मिमी, गडचिराेलीत १६ मिमी पाऊस झाला. गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात पावसाची नाेंद झाली.