औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम सत्राच्या परीक्षा दि. ९ ऑक्टोबरपासून घेण्याचा निर्णय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला.
पदवी व पदव्युत्तर अंतिम सत्राच्या परीक्षा दि. १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. यूजीसीने दिलेल्या अनुमतीनुसार राज्यातील सर्व विद्यापीठांना दि. ३१ ऑक्टोबरपुर्वी परीक्षा घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पदवी अंतिम सत्राची परीक्षा दि. ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून २९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये बीए, बीएस्सी, बीकॉम यासह व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
यावर्षी प्रथमच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा हा पहिलाच प्रयोग कितपत यशस्वी होतो, याविषयीही साशंकता आहे. परीक्षा झाल्या तरी निकाल व प्रवेश प्रकियेला अवधी लागणार आहे. त्यामुळे नवीन सत्र सुरू होण्यास थेट नविन वर्षापर्यंत थांबावे लागण्याची शक्यता आहे.