सुनील घोडके
खुलताबाद : शासनाकडून दिले जाणारे स्वस्त धान्य मिळत नसल्यामुळे खुलताबाद शहरातील एक टक्का (१९० जण) रेशनकार्ड धारकांनी रेशन दुकानदारच बदलून टाकला आहे. त्यातच मागील दोन-तीन वर्षांपासून तयार झालेल्या नवीन कार्डधारकांना शासकीय यंत्रणेतील त्रुटींमुळे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
खुलताबाद तालुक्यात एकूण ८९ स्वस्त धान्याची दुकाने आहेत. यात बीपीएल कार्डधारक निरंक आहेत. अंत्योदय योजनेचे १,९९१, (केशरी कार्ड) प्राधान्य कुटुंब योजनेचे १८,१०८ कार्डधारक आहेत, तर एपीएलचे २,४६६ कार्डधारक आहेत. सद्यस्थितीत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रति सदस्य ५ किलो धान्य मिळते. यात ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दर महिन्याला प्रतिव्यक्ती दिले जातात. खुलताबाद शहरात जवळपास दहा स्वस्त धान्य दुकाने आहेत. अनेक दुकानदारांकडून धान्य वेळेवर दिले जात नाही किंवा तांत्रिक अडचणी सांगून धान्य दिले जात नसल्याने एक टक्का लोकांनी दुकानदारच बदलला आहे. --- कनकशीळच्या ३५ जणांना धान्य मिळण्याची प्रतीक्षा खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ या गावातील जवळपास ३५ रेशनकार्ड धारकांना गेल्या दोन वर्षांपासून रेशनचे धान्य मिळत नाही. नंदा सुरेश बोडखे, देवराव एकनाथ यादव, विश्वनाथ बाबूराव दांडगे, त्र्यंबक आबळाजी जाधव, लक्ष्मीबाई रामचंद्र दांडेकर यांच्यासह ३५ जणांना धान्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यांनी गुरुवारी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.
तालुक्यातील एकूण कार्डधारक : २२,५६५
किती जणांनी बदलले दुकानदार : १९०
---
पॉईंट : १) खुलताबाद तालुक्यात तयार झालेल्या नवीन कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. २) शहरातील दहा दुकानांमधील १९० जणांनी दुकानदार बदलो. ३) खुलताबाद शहर सोडून तालुक्यातील ग्रामीण भागात दुकानदार बदलण्याचे प्रमाण कमी. ४) प्रत्येक गावात एकच दुकानदार असल्याने दुकानदार बदलण्यासाठी पर्याय नसतो.