वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, उमेदवाराकडून मतदारांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहावयास मिळत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात बड्या नेत्यांनी पाठ फिरविल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रचार करताना दमछाक होत आहे.
उद्योगनगरीत श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, नारायणपूर, तीसगाव, आंबेलोहळ, आदी ग्रामपंचायतींत अटीतटीच्या लढती होत आहेत. बहुताश ठिकाणी सत्ताधाऱ्यांविरोधात गावातील तरुण एकवटल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार असल्याने मातब्बर सक्षम उमेदवारांनी पॅनल न बनविता स्वतंत्रपणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. बहुतांश ठिकाणी पॅनल नसल्यामुळे अनेकांना सोईनुसार आघाड्या करीत आपापल्या वॉर्डापुरतेच पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जात आहे. गत आठवडाभरापासून निवडणुकीचा प्रचार सुरू असून उमेदवारांनी पदयात्रा, कॉर्नर मीटिंग घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंदा प्रस्थापितांच्या विरोधात गावातील तरुण मंडळींनी उडी घेतल्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, सर्वच उमेदवार पायांना भिंगरी लावून प्रचार करीत असल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहावयास मिळत आहे.
बड्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ
उद्योगनगरीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात बड्या नेत्यांनी पाठ फिरविल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. गावातील गट-तटाच्या राजकारणामुळे कार्यकर्ते दुखावले जाऊ नयेत, याची खबदारी घेत बड्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या परिसरात सर्वत्र चुरशीच्या लढती पाहावयास मिळत असून बड्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविल्याने काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
....................................