केऱ्हाळा : या आगोदर आपण मंत्री, आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित केलेला पाहिलेला आहे. किंबहूना हा आता शिरस्ताच पडला आहे; मात्र ग्रामपंचायत स्तरावर असा प्रयोग कोणी केल्याचे ऐकीवात नाही; पण सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा या गावातील विरोधी बाकावर बसलेल्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जनता दरबार आयोजित करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
तेरा सदस्य असलेल्या केऱ्हाळा ग्रामपंचायतमध्ये शिवसेना पुरस्कृत शिवशाही पॅनलचे दहा सदस्य निवडून आले आहेत. तर विरोधी संत गाडगेबाबा ग्रामविकास पॅनलचे तीन सदस्य निवडून आले आहेत. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, यात सविता कुडके या सरपंचपदी तर उपसरपंचपदी बिनाबी पठाण विराजमान झाल्या आहेत. निवडणुका होत नाहीत, तर विरोधी बाकावर असलेल्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे मनसुबे आखायला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विरोधी बाकावरील साहेबराव बांबर्डे, सूर्यभान बन्सोड, शिवनंदा भिंगारे या सदस्यांनी सोमवारी गावात जनता दरबारचे आयोजन केले होते. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या जनता दरबारमध्ये हजेरी लावून आपल्या समस्यांचा पाढा वाचला. नागरिकांनी मांडलेल्या या समस्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये मांडणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. दर तीन महिन्यांनी हा जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे सत्ताधारी पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट नागरिकांच्या समस्याचे ऑडिट करणार
गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे ऑडिट दरवर्षी करून त्यापैकी किती समस्यांना न्याय दिला, हे दरवर्षी नागरिकांसमोर लेखी मांडणार आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या मिटण्यास मदत होईल.-साहेबराव बांबर्डे, ग्रा. पं.सदस्य, केऱ्हाळा.
कोट
अनेक सदस्यांना अधिकाराची माहितीच नाही
अनेक ग्रामपंचायत सदस्यांना घटनेने आपल्याला काय अधिकार दिला, याची माहितीच नाही. प्रोसेडिंगला सही करा म्हटले की, सही करतात. काय काम करताहेत, काय करायचं, हे काम का होत नाही, हे करावंच लागेल, असे प्रश्न कोणीच विचारत नाहीत. परिणामी, नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळत नाही व गावचाही विकास होत नाही.
-सूर्यभान बन्सोड, ग्रामपंचायत सदस्य
फोटो : केऱ्हाळा येथील पहिल्याच जनता दरबारात ग्रामपंचायत सदस्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचताना महिला व नागरिक.
150221\20210215_091419_1.jpg
केऱ्हाळा येथील पहिल्याच जनता दरबारात ग्रामपंचायत सदस्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचताना महिला व नागरिक.