सिल्लोड : तालुक्यातील केऱ्हाळा येथील एकाने व्हाॅट्सॲप ग्रुपवर मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावतील, अशी धार्मिक पोस्ट केली. यामुळे गावासह सिल्लोड शहरात तणाव निर्माण झाला होता. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सदर व्यक्तीवर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. साहेबराव बंडू बांबर्डे (४१) असे आरोपीचे नाव आहे.
केऱ्हाळा येथील ग्रा. पं. सदस्य साहेबराव बांबर्डे या आरोपीने ‘आम्ही केऱ्हाळेकर’ या व्हाॅट्सॲप ग्रुपवर धार्मिक भावना दुखावतील, अशी सोमवारी एक वादग्रस्त पोस्ट केली. यामुळे गावासह सिल्लोड शहरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शेख मोहम्मद शेख युसुफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून बांबर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोनि. सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आडे, फौजदार लक्ष्मण कीर्तने करीत आहेत. पोलिसांनी केऱ्हाळ्यात मंगळवारी शांतता समितीची बैठक घेऊन नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन पोनि. सीताराम मेहेत्रे यांनी केले. तर अशा आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय सिल्लोड वकील संघाने घेतला असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे यांनी दिली.
गावात कडकडीत बंदया घटनेमुळे सिल्लोड शहरासह गावात तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांनी गावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता, तर नागरिकांनी केऱ्हाळा गावात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला.