श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती असून ई - ग्रामसॉफ्ट प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक गावात तसेच ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन असल्याचा दावा तालुका प्रशासनाने केला आहे. या उपक्रमामुळे ग्राम पातळीवरील कामे गतीमान झाली. मात्र अजुनही बहुतांश कामे कागदावरच करावी लागत असल्याची स्थिती असून ग्रामपंचायती ऑनलाईन झाल्या मात्र कामे ऑफलाईनच सुरू असल्याचे चित्र बहुतांश गावात आहे.
नागरिकांचे कामे तातडीने व्हावीत यासाठी शासनाने प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्रास मान्यता दिली आहे. यासह ग्रामपंचायतीचा कारभार ई - ग्रामसॉफ्ट प्रणालीच्या माध्यमातून चालत असल्याने नागरिकांचे कामास गती मिळाली असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय कामे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने दस्तर दिरंगाईचे प्रमाण कमी झाले असल्याची स्थिती आहे. ग्रामीण भागातील कारभार ऑनलाईन झाला असा दावा करण्यात येत असला तरी बहुतांश कामे अद्यापही ऑफलाईनच सुरू असल्याची स्थिती अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाहवयास मिळते.
---- ऑनलाईन मिळत नाही हे दाखले -----
ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन असल्याचा गवगवा करण्यात येत असला तरी बहुतांश कामे अद्यापही कागदावरच करावी लागतात. शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०१९ नुसार रहिवासी दाखला, हयातीचा दाखला, शौचालय दाखला, विधवा असल्याचा दाखला, परित्यक्ता दाखला, विभक्त कुटुंब दाखला, नोकरी व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, नळ जोडणी अनुमती प्रमाणपत्र, चरित्र दाखला, वीज जोडणी नाहरकत, कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, निराधार योजनेसाठी लागणारा वयाचा दाखला अशी अनेक प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कारभार कितीही ऑनलाईन दाखवल्या जात असला तरी तो प्रत्यक्षात ऑनलाईन आहे.
----- स्वयंघोषणापत्र आधार -----
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गावात विविध शासकीय कागदपत्रे मिळण्याची सोयी शासनाने केली आहे. त्यासाठी नागरिकांकडून स्वयंघोषणापत्र भरून घेत त्यांना आवश्यक ते कागदपत्रे शुल्क आकारून स्थानिक पातळीवर मिळतात. यात उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रांसह जातीचे दाखले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र घोषणापत्राचा आधार घेत देण्यात येतात.
----- ७५ टक्के कामे ऑनलाईन ---
मागील काही महिन्यापासून काही गावात संगणक ऑपरेटर मिळत नसल्याने ऑनलाईनची कामे रेंगाळत आहे. मात्र अशा ठिकाणी परिसरातील ऑपरेटरला पाठवून प्रलंबित कामे करावी लागतात. लहान गावातील गाव नमुना नंबर ८ पासून ते डाटा इन्ट्रीची जवळपास ७५ टक्के कामे ही ऑनलाईन आहे. तालुक्यातील मोठ्या गावातील डाटा इन्ट्रीची कामे ऑनलाईन करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कामात पारदर्शकता आली आहे.
- शरद पाटील, तालुका व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र सिल्लोड.