---
औरंगाबाद-ः ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामांना गतिमान करून ग्रामसेवकांचा आत्मविश्वास, कार्यक्षमता वाढविण्यासाठी ग्रामपरिवर्तन मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामपरिवर्तन विशेष मोहीम १० फेब्रुवारी ते ३१ मार्च या दरम्यान राबविण्यात येत आहे. यासाठी गटनिहाय ग्रामपंचायतीस एका क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आपल्या स्तरावर नियुक्ती करून या योजनेची अंमलबजावणी झाल्याची खात्री करावी लागणार आहे. तसेच त्यासंबंधीचा अहवाल पंचायत विभागाला द्यावा लागणार आहे, असे गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचायत कराची वसुली १०० टक्के करणे, ग्रामपंचायत लेखा परीक्षण अहवालात दर्शविलेल्या किमान ५० टक्के आक्षेपांची पूर्तता अहवाल सादर करणे, ग्रामपंचायतस्तरावरील दिव्यांग निधी, महिला व बाल कल्याण यांचे कल्याणार्थ निधी अनुशेषासह १०० टक्के खर्च करणे, झकास पठार लागवड पूर्वतयारी, सुंदर माझे गाव, कार्यालय अभियान राबविणे आदींचा सामावेश आहे. ग्रामपरिवर्तन विशेष मोहीम उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा गौरव करण्यात येणार असून उद्दिष्ट पूर्ण न करण्याऱ्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मोहीम यशस्वी करण्याचे आदेश डाॅ. सुनील भोकरे यांनी बुधवारी दिले.
--