मराठवाड्यात सामना बरोबरीत! भाजप-शिंदे गट ९३३, तर महाविकास आघाडीकडे ९३२ जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:35 PM2022-12-21T12:35:07+5:302022-12-21T12:36:44+5:30
बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे सदस्य अधिक, तर सरपंच हा भाजपचा निवडून आला आहे.
औरंगाबाद : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर होताच सरपंच पदावर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी दावेदारी ठोकली. वास्तविक, मराठवाड्यात हा सामना बरोबरीत सुटल्याचे चित्र आहे. २,०५२ ग्रामपंचायतींपैकी भाजप-शिंदे गटाकडे ९३३ तर महाविकास आघाडीला ९३२ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. उर्वरित १८७ जागांवर स्थानिक आघाड्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडीला कौल मिळाल्याचे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट तिघांच्या मिळून सर्वाधिक ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. थेट जनतेतून सरपंच निवडीचा भाजपला फायदा झाला आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचे सदस्य अधिक, तर सरपंच हा भाजपचा निवडून आला आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला जवळपास समसमान जागा मिळाल्या आहेत.
जालना, उस्मानाबाद भाजपकडे
परभणी जिल्ह्यात संमिश्र कौल मिळाला. तर जालना जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व दिसून आले. जिल्ह्यात सर्वाधिक भाजपचे सरपंच विजयी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच भाजपने बाजी मारली असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रस्थापितांना हादरे, नवख्यांना संधी
लातूर जिल्ह्यात प्रस्थापितांना हादरे बसले असून, मतदारांनी नवख्यांना संधी दिली आहे.
हिंगोलीत मविआ आघाडीवर
हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसून येत आहे. शिंदे गटानेही काही जागा जिंकल्या. मात्र, भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.
औरंगाबाद : भाजप-शिंदे गटाकडे
औरंगाबाद जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाचे २१६ पैकी १५८ सरपंच निवडून आल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.