लासूर स्टेशन: रमाई आवास योजनेअंतर्गत तक्रारदाराचे नाव पडताळणीसाठी पाठवण्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये घेणाऱ्या माळीवाडगाव येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही घटना सोमवारी ( दि. १० ) सकाळी 11 वाजता लासुर स्टेशन येथील बसस्थानकाच्या आवारात घडली. राजेंद्र जयराम रावते ( 35, रा शिल्लेगाव) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीवडगाव येथील तक्रारदार घरकुल मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुषंगाने रमाई आवास योजनेअंतर्गत तक्रारदाराचे नाव पडताळणीसाठी पाठवण्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी ग्रामसेवक राजेंद्र जयराम रावते यांनी केली. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यावरून आज सकाळी लासुर स्टेशन बस स्थानकाच्या आवारात सकाळी 11 वाजता सापळा लावण्यात आला होता. यावेळी तक्रारदाराकडून रोख पाच हजार रुपये स्वीकारताना राजेंद्र रावते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर, पो.ना. रविंद्र अंबेकर, पो. ना. गोपाल बरंडवाल पो.कॉ. किशोर म्हस्के चालक पो. कॉ. शिंदे यांनी केली.
ग्रामसेवक राजेंद्र रावते यांची मूळ नियुक्ती गंगापूरपासून जवळ असलेल्या शिरसगाव येथे आहे. या गावापासून तब्बल तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माळीवाडगाव ग्रामपंचायतीचा पदभार गेल्या वर्षभरापासून रावते बघत होते. सोयीची ग्रामपंचायत म्हणून त्यांनी या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारल्याची चर्चा होती.