औरंगाबाद : औरंगाबादेत सोमवारी झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाट (Shiv Sena MLA Sanjay Shirsat) यांनी थेट ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर निशाना साधला आहे. महिला सरपंचाना ( Women Sarpanach ) सल्ला देताना आ. शिरसाट म्हणाले, 'एक लक्षात ठेवा, सगळ्यात जर भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवेल हे सांगता येत नाही.तो तुमचे ऐकतो असे दाखवेल पण बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही' या वक्तव्याने आता नवा वाद सुरु झाला आहे. याचे पडसाद आज उमटले असून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनने आ. शिरसाट यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. आज त्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःच्या मतदारसंघात आलेल्या अनुभवावरून महिला सरपंचांना सल्ला देताना ग्रामसेवकांना भामटे संबोधले, महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर रहावं असा सल्ला ही आमदार शिरसाट यांनी यावेळी दिला. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता काही ग्रामसेवक चांगले काम करत असतील पण मला आलेल्या अनुभवावरून मी ते वक्तव्य केले. यावर मी ठाम आहे असेही आ. शिरसाट म्हणाले.
आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यातुन थेट ग्रामसेवकांनाच टार्गेट केल्यानं सरपंच परिषदेत त्यांचा हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला. आज याचे पडसाद उमटले असून ग्रामसेवकांनी आ. सिरसाट यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे. आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनने एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात युनियनने, आ. शिरसाट यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांनी जाहीर माफी मागून, आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. ग्रामसेवकांवर विश्वास ठेऊ नका असे म्हटल्याने आता ग्रामीण भागातील कामे कशी होणार असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, खुलताबाद पंचायत समिती कार्यालयासमोर आ.शिरसाठ यांचा निषेध करून तालुका ग्रामसेवक संघटनेने धरणे आंदोलन तालुकाध्यक्ष आसाराम बनसोड नेतृत्वाखाली सुरू केले आहे.