औरंगाबाद : दहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच सर्व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत झालेली सर्वसाधारण सभा ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येमुळे वादळी ठरली. सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत पैठणचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा, असा ठराव सभागृहाने मंजूर केला. लोंढे यांचे दलाल म्हणून वावरत ग्रामसेवकांना जेरीस आणणाऱ्या ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सखाराम दिवटे आणि ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांच्यावरही कारवाईची मागणी सदस्यांनी केली.
मराठवाडा महसूल प्रबोधिनीत सकाळी १० वाजेपासून ते अडीच वाजेपर्यंत आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी पाच पथकांची नेमणूक केली होती. अडीच वाजता सभेला सुरुवात झाली. तोच मधुकर वालतुरे यांनी मृत बिडकीनच्या ग्रामसेवक संजय शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्याची विनंती केली. त्यानंतर शिंदे यांना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. अध्यक्ष मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांची मंचावर उपस्थिती होती.
घोषणाबाजी आणि गोंधळसभा सुरू होताच मंचासमोर रमेश गायकवाड, केशवराव तायडे, मधुकर वालतुरे, रमेश पवार, विजय चव्हाण, प्रकाश चांगुलपाये आले. त्यांनी पैठणच्या गटविकास अधिकारी यांच्यासह त्यांच्या दलालांवर कारवाई केल्याशिवाय सभा चालू देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावर दिवटे यांना निलंबित केल्याची माहिती देत पैठणचे बीडीओ लोंढे यांचा पदभार काढून तो सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली. तरीही सभासदांचे समाधान झाले नाही. विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आठ दिवसांत चौकशी पूर्ण करण्यासह चार्जशिट दाखल करुन शासनाला कारवाईची शिफारस करू, असे सांगितल्यावर सभेचे कामकाज सुरू झाले.
...तर शिंदेची आत्महत्या टळली असती२०१३ पासून सदस्यांनी वारंवार दिवटेंवर कारवाईची मागणी केली. मात्र, पंचायत विभागाकडून त्यांची पाठराखण करण्यात आल्याचा आरोप उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी केला. तर रमेश पवार म्हणाले, दोन वर्षांपासून दिवटेंवर कारवाईची मागणी करीत होतो. त्यांच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर संजय शिंदे यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. तर किशोर पवार यांनीही दिवटेंवर एवढ्या भ्रष्टाचाराचे आरोप असताना त्यांना अभय कोणी दिले त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तर महिला ग्रामसेवकांना त्रास देणाऱ्या बीडीओंच्या दलालांवर कारवाईची मागणी रमेश गायकवाड यांनी केली.
तिसऱ्या अपत्याची भीती दाखवून शिंदेंचा छळविजय चव्हाण म्हणाले, ग्रामसेवकांना अरेरावी तर तीन महिन्यांपासून अधिकाऱ्याचा छळ सुरू होता. मी लोंढेंचा विषय सर्वसाधारण सभेत मांडू नये म्हणून संजय शिंदेंनी विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी कारण सांगितले. लोंढे यांनी संजय शिंदेंच्या तिसऱ्या अपत्याची भीती दाखवून संजय शिंदेंचा छळ केला. त्यामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. दिवटे आणि लोंढे यांच्यावर २०६ अ अन्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी रमेश गायकवाड यांनी केली.
८६७ ग्रामपंचायतींचा कारभार बंदजिल्ह्यातील ८६७ ग्रामपंचायतींचा कारभार बंद पडलाय. पैठण बीडीओंचा कार्यभार आजच काढा, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. त्यावर कवडे यांनी लोंढे यांचा पदभार काढून सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याकडे दिल्याचे सांगितले. तर शिंदेकडून दलालामार्फत पैठणच्या बीडीओंनी लाखोंची मागणी केल्याचे खुद्द उपाध्यक्षांनीच आरोप केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.