औरंगाबाद : सृजन, मांगल्य आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कलशाला डोक्यावर घेत शहरातील हजारो महिलांनी गुरुवारी मंगल कलशयात्रा काढली. मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन निसर्गाची कृपा सदोदित राहावी यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. पाटीदार भवनपासून ते टकसाळी मंगल कार्यालयापर्यंतच्या या पदयात्रेत विविध वयोगटातील महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या. आजघडीला पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल पूर्ववत करण्यासाठी हरिद्वारच्या गायत्री परिवारातर्फे चार दिवसांचा भव्य गायत्री संस्कार आयोजित केला आहे. यावेळी गायत्री परिवाराचे संजय टांक, मुकेश चोटलानी, प्रकाश पटेल, राम कलानी, सांडू मानके, सतीश वेद उपस्थित होते. शांतिकुंज हरिद्वार येथून कैलास महाजन आणि गोविंद पाटीदार यांनी मंत्रवाचनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी कलशाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘कलशात ३३ कोटी देवतांचा निवास असतो व केवळ नारीच शक्ती त्याचे समर्थपणे वहन करूशकते. गायत्री मंत्राचे पठण करत स्त्रियांनी वरुण देवतेला आवाहन केले. हजारो महिला व मुली कलशयात्रेत सामील झाल्या होत्या. यात विविध वयोगटातील महिला पावसातही कलश घेऊन पाटीदार भवनपासून टाकसाळी मंगल कार्यालयापर्यंत चालत गेल्या. अनेकांनी या यात्रेचे दर्शन घेतले. ‘नारीचा सन्मान जिथे, संस्कृतीचे उत्थान तिथे’ ही घोषणा देत यात्रा निघाली होती. कलशयात्रा टाकसाळी मंगल कार्यालयात पोहोचल्यावर यज्ञशाळेत कलशधारी महिलांची आरती करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेसात ते अकरा गायत्री महायज्ञ होईल. यात साधकच नाही तर सामान्यही सहभागी होऊ शकतील. पर्यावरण स्वच्छतेसाठी विशेष हवनसामग्री यात वापरली जाणार आहेत. यामुळे प्रदूषण टाळले जाईल, असे परिवाराचे प्रमुख स्वयंसेवक राजेश टांक यांनी सांगितले.
भव्य कलशयात्रेत नारी शक्तीचा जयघोष
By admin | Published: January 02, 2015 12:29 AM