छत्रपती संभाजीनगर : आजोबांचा दफनविधी पूर्ण होताच शाकेर खान शकूर खान (२३, रा. प्रियदर्शनीनगर, गारखेडा) याने गुन्हेगार मित्राला बोलावून सख्ख्या मामाचे घर फोडले. यात जवळपास ६ तोळे सोने, चांदीच्या दागिन्यांसह दीड लाख रोकड चोरून नेली. गुन्हे शाखेने बुधवारी कुख्यात गुन्हेगार शेख मुख्तार शेख महेबूब (रा. पाचोरा) याला अटक केल्यानंतर शाकेरचा सहभाग निष्पन्न झाला. मुख्तारने गावातीलच सराफ्याला हे सर्व दागिने विकले होते.
बॅटरीचे व्यापारी सय्यद शकील सय्यद उमर (५१, रा. पिसादेवी) यांच्या कटकट गेट भागात राहणाऱ्या वडिलांचे ८ जानेवारी रोजी निधन झाले. पत्नी, मुलांसह ते दफनविधीसाठी गेले. ९ जानेवारी राेजी सकाळी घरी परतले असता चोरी झाल्याचे समजले. उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या सूचनेवरून निरीक्षक संदीप गुरमे यांचे पथक घरफोडीची उकल करत होते. त्यात पाचोऱ्यातील ५ गुन्हे दाखल असलेला मुख्तारने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. सोळुंके यांनी तत्काळ पथकासह धाव घेत गावातूनच त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सराफा व्यावसायिक किरण बन्सीलाल देवरे (५५, रा. पाचोरा) याला विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी ६२.७२० ग्रॅम सोने, ३३६ ग्रॅम चांदी व दीड लाख रुपये जप्त केले.
आरोपी स्कूल बस चालकशाकेर हा तक्रारदार सय्यद शकील यांचा सख्खा भाचा आहे. ५ वर्षांपूर्वी तो पाचोऱ्यावरून शहरात स्थायिक झाला. त्याच्यावर २०१९ मध्ये एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. मामाचे सर्व कुटुंबीय रात्री कटकट गेटलाच राहणार असल्याचे कळाल्यानंतर शाकेरने मुख्तारला बोलावून घेत चोरी केली. विशेष म्हणजे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला शाकेर एका शाळेच्या बसचा चालक आहे.