याविषयी सांगताना वृद्धाश्रमाच्या संचालिका मालती करंदीकर म्हणाल्या की, कोरोना येण्यापूर्वी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी, वृद्धाश्रमाला काही भेट देण्यासाठी किंवा वृद्धाश्रमात एखादी कला, भजन सादर करायला येणाऱ्यांची नेहमीच रेलचेल असायची. अनेक दात्यांना आम्ही आमच्यासोबत आपुलकीने जेवायला बोलवायचो. ज्येष्ठांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला अनेक जण नियमितपणे वृद्धाश्रमात यायचे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचे प्रमाणही उल्लेखनीय असायचे. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम आणि आपलेपणाने केली जाणारी चौकशी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना हवीहवीशी वाटायची. त्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना सध्या कुटुंबीयांपेक्षाही या मंडळींची जास्त आठवण येते आहे.
चौकट :
वृद्धाश्रमातील एकूण सदस्य
स्त्री- २८
पुरुष- ४
चौकट :
कुणाचीही भेटगाठ नाही
वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची कोरोनापासून सुरक्षितता, हा सध्याच्या काळात आश्रमाच्या व्यवस्थापनासमोर असलेला मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुक्तिसोपान वृद्धाश्रमात सध्या बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाही. वृद्धांच्या नातलगांनाही येण्यास परवानगी नाही. त्यामुळे त्यांचे नातलग केवळ फोनच्या माध्यमातून ज्येष्ठांशी संवाद साधतात.
चौकट :
मदतीचा ओघ वाढला
मुक्तिसोपान वृद्धाश्रमाला लोकांच्या मदतीचा मोठा आधार आहे. लॉकडाऊन, कोरोना यामुळे हा आधार कुठेही कमी झालेला नाही. उलट कोरोनाकाळात मदतीचा ओघ वाढला आहे. या काळात आम्हाला लोक आवर्जून फोन करतात आणि वृद्धाश्रमाला किंवा तेथील ज्येष्ठांना कोणत्या गोष्टींची गरज आहे का, याची आपुलकीने चौकशी करतात, असे आश्रमाच्या संचालिका मालती करंदीकर यांनी सांगितले.
चौकट :
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ म्हणतात...
१. त्यांची आठवण येते
लॉकडाऊन, कोरोना यामुळे आश्रमात आमच्या भेटीसाठी किंवा मदतीसाठी जे लोक नियमितपणे यायचे, ते लोक सध्या येत नाहीत. त्यामुळे त्या आपुलकीने भेटायला येणाऱ्या लोकांची आम्हाला या काळात आठवण येते, असे काही ज्येष्ठ म्हणतात.
२. टीव्ही पाहून मन रमवतो
भेटायला येणारे लोक कमी झाल्यामुळे कधी- कधी कंटाळा येतो; पण मग आम्ही सगळे जण एकत्र बसून टीव्ही पाहतो, भजन करून मन रमवतो किंवा गप्पा- गोष्टी करत बसतो. त्यामुळे मग आमचाही विरंगुळा होऊन जातो.
३. नित्यक्रम मजेत सुरू
पुस्तक वाचणे, देवाची उपासना करणे, गप्पागोष्टी करणे, टीव्ही पाहणे, भजन म्हणणे, असा आमचा नित्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू आहे. सध्या कुणी नसल्याने जरा कंटाळा येतो; पण आमचा नित्यक्रम मजेत सुरू आहे.
फोटो ओळ :
टीव्ही पाहून स्वत:चा विरंगुळा करून घेताना मुक्तिसोपान वृद्धाश्रमातील आजी.