वाळूज महानगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाळूज येथे १ हजार ६०१ नागरिकांनी स्वच्छतागृह बांधले असून, या लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांप्रमाणे १९ कोटी २१ लाख २ हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे. बेसलाईन सर्व्हेनुसार यादीत नावे समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांचा ग्रामपंचायतीकडून शोध सुरु झाला आहे.
नागरिकांत स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी तसेच प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतागृह बांधावे, यासाठी शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात येते. स्वच्छतागृह बांधणाऱ्या लाभार्थ्याला प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. वाळूज गावात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनेक कुटुंबांनी स्व:खर्चाने स्वच्छतागृह बांधली आहेत. बेसलाईन सर्व्हेनुसार गावातील १६०१ लाभार्थ्यांनी स्वच्छतागृह उभारली असून, त्यांची नावे यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली आहे. या सर्व्हेनुसार यादीत नावे समाविष्ट असणाºया कुटुंबाना अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, गावात बहुतांश कामगार वर्ग वास्तव्यास असून, अनेक कामगार स्थालांतरित झाल्याने या लाभार्थ्यांचा शोध घेताना ग्रामपंचायत प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.