शिराढोण : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या बळीराजा चेतना अभियानात कोणतीही समिती नियुक्त न करता ८९ हजार रूपये हाडप केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवकासह तिघाविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना ३ जून २०१६ ते २० जून २०१६ या कालावधीत कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम येथे घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू केले़ या अभियानातून ग्रामपंचायतीने ग्रामस्तर ही मदत शेतकऱ्यांना द्यायची होती़ शेतकऱ्यांना दवाखाना, शेतातील औजारे, शिलाई मशीन, दुधाळ जनावरे, शेळीपालनासाठी मदत केली होती़ यासाठी ग्रामपंचायतीने १० सदस्यांची ग्रामसमिती तयार करून समितीच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना धनादेशामार्फत आर्थिक मदत द्यावयाची होती़ लोहटा पश्चिम येथील तत्कालीन सरपंच अल्का वाघमारे, तत्कालीन ग्रामसेवक महेश त्रिंबक पाटील, शेतकरी अतुल रामभाऊ हुंबे यांनी संगणमत करून ३ जून २०१६ ते २० जून २०१६ या कालावधीत ८९ हजार रूपये उचलून ती रक्कम हडप केल्याची फिर्याद विस्तार अधिकारी विलास माचवे यांनी २४ मार्च रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात दिली़ माचवे यांच्या फिर्यादीवरून सरपंच अल्का वाघमारे, तत्कालीन ग्रामसेवक महेश पाटील, अतुल हुंबे या तिघांविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संजिवन मिरकले हे करीत आहेत़
८९ हजारांचे अनुदान लाटले
By admin | Published: March 27, 2017 11:51 PM