रामनगर : जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर तसेच नाव्हा परिसरात द्राक्ष बागांची आॅक्टोबर छाटणी जोरात सुरु आहे. दुष्काळातून वाचविलेल्या बागापासून द्राक्ष उत्पादकांना यावर्षीचा हंगाम फायदेशिर ठरणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.महाराष्ट्रात द्राक्षाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या कडवंची गावाचा आदर्श घेत जिल्ह्यात आता बहुतांश गावात द्राक्ष लागवड होत आहे. कडवंची, नंदापूर, पिरकल्याण, नाव्हा, वरुड, वखारी, सिंधी काळेगाव, उटवद, पाचनवडगावसह तालुक्यातील अनेक गावात द्राक्ष बागा बहरल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने द्राक्ष उत्पादकांना चांगलेच जेरीस आणले होते. द्राक्ष बागेपासून मिळणारा सर्व पैसा बागा वाचविण्यावर खर्च करावा लागत असल्याचे रवींद्र क्षीरसागर, सुरेश क्षीरसागर यांनी सांगितले. परंतु यावर्षी परिस्थिती अतिशय चांगली असून येणारा हंगाम निश्चितच द्राक्ष उत्पादकांना आर्थिक स्थैर्य निर्माण करुन देईल, असा विश्वास प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव क्षीरसागर यांनी व्यक्त केला. कडवंची गावातच जवळपास १२०० एकर द्राक्ष बागा असल्याचे विष्णू क्षीरसागर यांनी सांगितले. बागा वाचविण्यासाठी गतवर्षी अकरा लाखापर्यंतचा खर्च पाण्यावर केला होता. (वार्ताहर)
द्राक्ष बागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग!
By admin | Published: October 10, 2016 12:29 AM