- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : मराठवाड्यात चार वर्षांपूर्वी पहिले अवयवदान झाले आणि अवघ्या काही महिन्यांत अवयवदानाची चळवळ वाढली. एका व्यक्तीच्या अवयवदानाने अनेकांना नवीन आयुष्य मिळाले. परंतु गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आलेख घसरला आहे. परिणामी अवयवांच्या प्रतीक्षेत मराठवाड्यात शेकडो रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. शासनस्तराबरोबर प्रत्येक व्यक्तीकडून अवयवदानाच्या चळवळीला हातभार लावण्याची गरज आहे.
जगभरात १३ आॅगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिवस म्हणून पाळण्यात येतो. अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान समजले जाते. एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाने म्हणजे किमान सहा जणांना जीवदान मिळू शकते. औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण आणि २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण करून मराठवाड्याने नवीन इतिहास रचला. प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांच्या आयुष्यात उजाडलेली ही नवीन पहाट होती.
मराठवाड्यात २०१६ पासून आतापर्यंत २४ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. यातून ४५ किडनी, २१ यकृत आणि १० हृदय, अशा ७६ अवयवांचे प्रत्यारोपण झाले. औरंगाबादसह पुणे, मुंबई, नागपूर याठिकाणी अवयवांचे प्रत्यारोपण झाले. यात दोन हृदयांचे चेन्नई येथे प्रत्यारोपण झाले. याव्यतिरिक्त २८ नेत्ररोपणदेखील झाले. त्यामुळे अनेकांना दृष्टीही मिळाली. गेल्या काही कालावधीत या चळवळीला मराठवाड्यात अनेक कारणांनी ‘ब्रेक ’ लागत आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ दोन ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदान झाले. या दानाबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर होण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करीत आहेत. अनेक रुग्णालयांकडून ब्रेनडेड जाहीर केले जात नाही. त्यामुळे ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचता येत नसल्याचीही बाब पुढे आली आहे.
२७६ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत मराठवाड्यात सध्या तब्बल २७६ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. याबरोबरच ८६ रुग्णांना यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. तुलनेत अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अवयवांसाठी गरजू रुग्णांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
१२ हजार लोकांनी भरली संमतीपत्रेशहरातील औरंगाबाद युथ सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे अवयवदानाविषयी जनजागृती केली जाते. फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात १२ हजार लोकांनी अवयवदानाविषयी संमतीपत्रे भरली आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच ‘झेडटीसीसी’चे सदस्य राजेशसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.
इतरांनाही प्रेरणा मिळतेयज्या समाजात राहतो, त्या समाजाप्रती काहीतरी देणे असते, अशी वडिलांची धारणा होती. त्यामुळे ओढावलेल्या प्रसंगात वडिलांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे इतरांना जीवदान मिळाले. आमच्या कुटुंबियांच्या या निर्णयाने समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळत आहे. अनेक जण अवयवदानाविषयी विचारणा करतात.- नितीन माठे, अवयवदात्याचा मुलगा
ब्रेनडेड जाहीर होणे महत्त्वाचे मेंदू जरी मृत झाला, तरी रुग्णांचे इतर अवयव कार्यरत असतात. अशा वेळी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. रुग्णालयांनी ब्रेनडेड जाहीर करणे, हे गरजेचे असते. त्यानंतरच ‘झेडटीसीसी’ला माहिती मिळते आणि नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. अवयवदानाचे प्रमाणही काहीसे कमी झाले आहे. अवयवदान वाढविण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जाते.- मनोज गाडेकर, समन्वयक, झेडटीसीसी
गैरसमज दूर व्हावा जानेवारी २०१६ मध्ये अवयवदानाची चळवळ सुरू झाली. प्रारंभी मोठ्या प्रमाणात अवयवदान झाले. मात्र, गेल्या वर्षभरात प्रमाण कमी झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने सहा जणांना जीवदान मिळते. अवयवदानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. नातेवाईक, मित्र परिवाराला प्रेरित केले पाहिजे.- डॉ. आनंद देवधर, हृदयरोग शल्यचिकित्सक
अवयवदानाची स्थिती वर्ष अवयवदान२०१६ ९२०१७ ६२०१८ ७२०१९ (आतापर्यंत) २एकूण २४