वाळूज महानगर: वाळूज येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी गरवारे कंपनीला साकडे घालण्यात आले आहे. टँकरचा प्रस्ताव कंपनीकडे सादर करण्यात आला आहे.
एमआयडीसीकडून वाळूजला मिळणाऱ्या पाणी कोट्यात कपात झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहेत. सध्या गावात आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच पाणी पुरवठा कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नळयोजना असलेल्या वसाहतीत आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा सुरु असला तरी ज्या वसाहतीत नळयोजना नाही, अशा भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, वाळूज गावात दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक बांधीलकी जोपासात गरवारे उद्योग समूहाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरु असल्यामुळे किमान उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबत असते. यंदाच्या उन्हाळ्यात गावात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने गरवारे उद्योग समूहाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी प्रस्ताव देण्यात आल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले. पाणी टंचाई असलेल्या वसाहतीत पाण्याच्या टाक्या ठेवुन या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा आशयाचे पत्रही ग्रामपंचायतीकडून गरवारे समुहाला देण्यात आले आहे.