पैठण (औरंगाबाद ) : तालुक्यातील आवडे उंचेगाव येथील ग्रामस्थांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुबियांना ४५ हजार रूपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. लष्कराचे जवान सीमेवर रक्षा करतात म्हणून आम्ही व आमचे कुटुंब सुरक्षित राहतात, परंतु देशाचे रक्षण करताना जवान शहीद झाले तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही सर्व भारतीयांची आहे, या भावनेतून आम्ही हा निधी गोळा केला. या उपक्रमास गावकऱ्यांनी मनापासून प्रतिसाद देत मदत केली, असे गावकऱ्यांनी सांगितले.
केवळ ३०० उंबरे असलेल्या आवडे उंचेगाव येथील ग्रामस्थांनी शहीद झालेल्या जवानांसाठी मदत फेरी काढली. या मदतफेरीत ४५ हजार रुपये जमा झाले होते. आवडे उंचेगाव येथील सतीश आंधळे, किरण आंधळे, कृष्णा काकडे, जालिंदर ढाकणे, ईश्वर वाकडे आदींनी चोर पांगरा (गोवर्धन तांडा) ता. लोणार जि. बुलडाणा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. नितीन राठोड यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या वीरपत्नी वंदना राठोड यांना २२५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यानंतर मलकापूर जि. बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवान संजय राजपूत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेत शहीद संजय राजपूत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वीर पत्नी सुषमा राजपूत यांना २२५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.