- कैलास पांढरे
केऱ्हाळा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरही बाल संस्कार व्हावेत यासाठी एका ध्येयवेड्या मुख्याध्यापकाने जिल्हा परिषद शाळेत दीड लाख रुपये खर्च करुन बाल संस्कार केंद्र उभारले आहे. आपली शाळा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी यासाठी या शिक्षकाची धडपड वाखाणण्याजोगी आहे. रामचंद्र मोरे असे या अवलिया मुख्याध्यापकाचे नाव आहे.
शहरी भागात विद्यार्थ्यांना अनेक सुविधा उपलब्ध असतात. यामुळे लहान वयातच येथे विद्यार्थ्यांवर बाल संस्कार रुजवून शालेय धडे गिरविले जातात. मात्र, ग्रामीण भागात अशा सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शहरी भागापेक्षा शिक्षणात मागे पडतात. गावाशी नाळ जुळलेले केऱ्हाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रामचंद्र मोरे यांच्या ही बाब लक्षात आली. आपली शाळा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, ही त्यांची पूर्वीपासून धडपड आहे. त्यांनी शाळेत बाल संस्कार केंद्र उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातून दीड लाख रुपये खर्चून बाल संस्कार केंद्र उभारले आहे. या बाल संस्कार केंद्रास डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बाल संस्कार केंद्र असे नाव देण्यात आले आहे. या केंद्रात चिमुकल्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी खेळणी उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, कोरोनामुळे या बाल संस्कार केंद्रात अद्याप किलबिलाट अनुभवायला आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्नबालवयात मुलांचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्यास भविष्यात विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेला तोंड देण्यास पात्र ठरतो. यासाठी सुरुवातच बाल संस्कार केंद्रातून करावी लागते. म्हणून मी स्वखर्चाने हे बाल संस्कार केंद्र उभारले आहे. विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला तर शाळा आंतरराष्ट्रीय होण्यास वेळ लागणार नाही.-रामचंद्र मोरे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, केऱ्हाळा