छत्रपती संभाजीनगर : एखाद्या ऐतिहासिक वास्तूची देखभाल-दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम म्हटले की, वरवर डागडुजी, भेगा बुजविणे, झाडीझुडपी हटविणे, इतकेच नजरेसमोर येते. परंतु संवर्धनाचे काम इतकेच मर्यादित नाही. तर एक एक दगड वेगळा करून ‘ती’ ऐतिहासिक वास्तू पूर्णपणे बाजूला काढली जाते. त्यानंतर पायापासून पुढे पुन्हा जशीच्या तशी ती उभारण्याची कियमाही साधली जाते. मराठवाड्यात आजघडीला परभणी येथील धारासूर येथे अशाप्रकारचे अद्भुत असे काम हाती घेण्यात आले आहे.
परभणीपासून ३५ कि.मी.वर असलेले धारासूर हे गाव तसे सामान्य गावासारखेच. येथेच गुप्तेश्वर मंदिर आहे. या धारासूर गावाचा धारासूर कोण होता, मंदिर कोणी बांधले किंवा गुप्तेश्वर नाव कसे पडले याचे फारसे संदर्भ मिळत नाहीत; पण मंदिर बांधणीच्या शैलीवरून काळासंदर्भात काही अंदाज बांधले जातात. दहा फूट उंच पीठावर उभे असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. अनेक वर्षांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे ते एका बाजूने झुकले. मंदिराच्या उत्तर बाजूचा भाग ढासळला. आता राज्य पुरातत्त्व विभागातर्फे या मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
कसे केले जाते काम?राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे म्हणाले, गुप्तेश्वर मंदिरावरील प्रत्येक भागावर नंबर टाकण्यात आलेले आहेत. मंदिराचा सर्व भाग बाजूला काढून पायापासून पुन्हा उभारणी केली जाईल. सध्या मंदिराचे शिखर उतरविण्याचे काम सुरू आहे. जो भाग खराब झाला आहे, तो तयार केला जाईल. आगामी तीन वर्षे हे काम चालेल. अशाप्रकारे मराठवाड्यात यापूर्वी ठिकठिकाणी कामे केलेली आहेत.
यापूर्वी येथे अशा पद्धतीने केले संवर्धन काम- देवी मंदिर, किल्लारी, लातूर.- सिद्धेश्वर मंदिर, होट्टल, नांदेड.- पार्वती मंदिर, होट्टल, नांदेड.- गोकुळेश्वर मंदिर, चारठाणा, परभणी.- जोडमहादेव मंदिर, चारठाणा, परभणी.- नृसिंह मंदिर, चारठाणा.- केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, बीड.- उत्तरेश्वर मंदिर, तेर.- महालक्ष्मी मंदिर बारव, जागजी, धाराशिव.- शिवगुरू समाधी, धाराशिव.- गरुड मंडप, राहेर, नांदेड.- शंखतीर्थ मंदिर, मुदखेड, नांदेड.