औरंगाबाद :सीएच्या अंतिम परीक्षेत १०० पैकी १० जण यशस्वी होतात. नापास झालेल्यांना पुढे नोकरीत मोठा वाव मिळत नाही. मात्र, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने नवीन अभ्यासक्रमात अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जे काही कारणास्तव सीएची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत, अशांना ‘बॅचलर ऑफ अकाउंट असिस्टंट’ (बीएए) ही पदवी दिली जाणार आहे. याचा नोकरीत त्यांना निश्चित फायदा होईल, अशी माहिती आयसीएआयच्या बीओएसचे (बोर्ड ऑफ स्टडी) अध्यक्ष सीए दयानिवास शर्मा यांनी येथे दिली.
सीए संघटना व विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेसाठी सीए दयानिवास शर्मा शहरात आले होते. यानिमित्त आयोजित बैठकीत त्यांनी सांगितले की, वस्तू व सेवा कायदा, इन्कम टॅक्समधील बदल, डिजिटल शिक्षणावर भर, याचा विचार करून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा नवीन अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. नवीन बदलामध्ये प्रात्यक्षिकांवर आधारित अभ्यासक्रमावर जास्त भर देण्यात आला आहे. हा नवीन अभ्यासक्रम नोव्हेंबर २०२२ नंतर लागू होईल. ते म्हणाले की, तत्पूर्वी नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. परीक्षा कठीण असली, तरी देशभरात अभ्यासक्रम व्यावहारिक स्वरूपाचा असावा, अशी आयसीएआयची भूमिका आहे. डिजिटल अकाऊंटिंगमध्ये अपडेट राहण्यासाठी एसएपी या प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी सीए होता यावे, असा अभ्यासक्रम बनविला जात असल्याचे शर्मा यांनी आवर्जून सांगितले. यावेळी परिषदेचे संचालक उमेश शर्मा, सीए संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष गणेश भालेरावर, विकासा अध्यक्ष महेश इंद्राणी यांची उपस्थिती होती.
आर्टिकलशिप झाल्यानंतर सहा महिन्यांनी परीक्षानवीन अभ्यासक्रमानुसार सीए कोर्स दोन वर्षांत पूर्ण करता येईल. आर्टिकलशिप झाल्यानंतर सहा महिन्यांनी सीएची परीक्षा देता येईल. इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेत विषयांची संख्या कमी करण्यात येणार आहे. काही विषय ‘ई-लर्निंग’ पद्धतीने शिकविले जातील. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा होईल. या बदलांमुळे अंतिम परीक्षेत दोन ग्रुपमध्ये ८ ऐवजी ६ विषय असतील.