पैठण : गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीचा जलसाठा रात्रीतून पाऊण 'टीएमसी'ने वाढला आहे. जायकवाडी धरणावर ८२ मी.मी. पावसाची नोंद झाली असून धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात मोठी भर पडली. १ जून पासून २२६.४४३ दलघमी ( ८ टिएमसी) जलसाठ्यात भर पडली आहे. गत वर्षी धरणावर एकूण ४९६ मि मी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र २३ जुलै रोजीच धरणावर एकूण ४९६ मि मी पाऊस नोंदवला गेला आहे. धरणाचा जलसाठा शुक्रवारी सायंकाळी ४२.३९ टक्के झाला होता.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावरच जायकवाडीची भिस्त असल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. परंतु, यंदा मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याचा एक थेंब आलेला नसताना जायकवाडीच्या जलसाठ्यात केवळ स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने भर पडली आहे. जायकवाडी धरणाचे स्थानिक व मुक्त पाणलोट असलेल्या औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, पैठण, शेवगाव ,वैजापूर, श्रीरामपूर, येवला, शिर्डी आदी भागात पावसाने सातत्य राखल्याने १ जून पासून जलसाठ्यात भर पडण्यास प्रारंभ झाला आहे.
गुरुवारच्या पावसाने मोठी आवक गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने धरणात २० दलघमी पाण्याची आवक झाल्याचे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदीप राठोड यांनी सांगितले. आज रोजी धरणात १६५८ दलघमी ( ५८ टिएमसी) जलसाठा झाला आहे. यापैकी उपयुक्त जलसाठा ९२० दलघमी ( ३२ टीएमसी ) ईतका आहे.
यंदा धरण १०० टक्के भरण्याची अपेक्षा...जायकवाडी धरणात अद्याप नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्याची आवक झालेली नाही. स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने जलसाठ्यात झालेली वाढ अत्यंत दिलासा देणारी आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून आवक आल्यास जायकवाडी धरण यंदा १००% भरेल अशी अपेक्षा कडाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.