- राम शिनगारे
औरंगाबाद : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या विस्तारामध्ये मराठवाड्याला पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर अधिकची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही यादीवरून स्पष्ट होत आहे. मुख्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीसची जबाबदारी मराठवाड्यातील नेत्यांवर देण्यात आली आहे. यामुळे भाजप आगामी काळात मराठवाड्यावर अधिक लक्ष देणार असल्याचा संदेशही देण्यात आला आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणमध्ये बीडच्या खासदार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे, तर उस्मानाबादचे विधान परिषदेतील आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सरचिटणीसपदी निवड केली आहे, तर चिटणीसपदी लातूरचे नागनाथ निडवदे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील इद्रिस मुलतानी यांची नेमणूक केली.
याशिवाय लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे पुनर्वसन करीत त्यांना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. याचवेळी औरंगाबादचे हाजी मोहम्मद एजाज देशमुख यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी सोपविली आहे, तसेच भाजपच्या विविध सेलच्या संयोजक, सहसंयोजक पदावरही मराठवाड्याला पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात विधि सेलची जबाबदारी उस्मानाबादचे मिलिंद पाटील, बुद्धिजीवी सेलची दत्ता कुलकर्णी, नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे वैद्यकीय, लातूरचे शैलेश गोजमगुंडे यांच्याकडे सांस्कृतिक आणि हिंगोलीचे शरद पाटील यांच्याकडे कामगार सेलची जबाबदारी सोपवीत प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, याकडे लक्ष देण्यात आल्याचे कार्यकारिणीवरून दिसून येते.
प्रदेश कार्य समितीमध्ये औरंगाबादचे खा. डॉ. भागवत कराड, मनोज पांगारकर, सुरेश बनकर पाटील, नगरसेवक राजू शिंदे, प्रवीण घुगे, नांदेड जिल्ह्यातील संजय कौडगे, दिलीप कंदकुर्ते, संतुकराव हुंबर्डे, संध्या राठोड, परभणी जिल्ह्यातून रामप्रभू मुंडे, अभय चाटे, लातूर जिल्ह्यातून माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, अॅड. जयश्री पाटील, बीड जिल्ह्यातून रमेश पोकळे यांची वर्णी लागली आहे. निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये सर्वाधिक प्रतिनिधी मराठवाड्यातील आहेत.
दिग्गजांचे पंख छाटले का?भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये काही अपवाद वगळता माजी मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेलकर यांच्या समर्थकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे. याविषयी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुजबूज करण्यात येत आहे.