औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत एअर कार्गो सेवेचा प्रारंभ करण्यासाठी प्राधिकरणास अखेर ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी (बीसीएएस) कडून हिरवा कंदिल मिळाला आहे. ‘बीसीएएस’कडून सुरक्षेसंदर्भात मंजुरी मिळाली असून लवकरच विमानतळावरील कार्गो कॉम्प्लेक्समधून देशांतर्गत एअर कार्गोची सेवा सुरू होईल.देशांतर्गत एअर कार्गो सेवेसाठी दिल्ली येथील कार्गो सर्व्हिस सेंटरला कंत्राट मिळाले आहे. विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीच्या जागेतून ही सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर करण्यात आले आहे. नियमानुसार सुरक्षेसंदर्भात आवश्यक बाबी आहेत की नाही, याचे ‘बीसीएएस’कडून आॅडिट करण्यात आले होते. या पाहणीनंतर ‘बीसीएएस’ने कार्गो कॉम्प्लेक्समधील काही मुद्यांसंदर्भातील त्रुटींची पूर्तता करण्याविषयी प्राधिकरणाक डून माहिती मागितली. त्यानुसार प्राधिकरणाकडून संबंधित माहितीची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे अखेर ‘बीसीएएस’कडून प्राधिकरणास सुरक्षेविषयी क्लिअरन्स देण्यात आले. आगामी काही दिवसांत देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरू होईल, असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले. चिकलठाणा विमानतळावरून सध्या दरवर्षी सुमारे दीड हजार टन उद्योग, शेती व्यवसायातील माल निर्यात केला जातो. विमानतळावर कार्गो कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशांतर्गत एअर कार्गो सेवेसाठी ‘बीसीएएस’कडून हिरवा कंदिल
By admin | Published: May 30, 2016 1:08 AM