औरंगाबाद : इंधन दरवाढीची झळ रिक्षाचालकांनाही सहन करावी लागत आहे. परिणामी, औरंगाबादेत इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकीपाठोपाठ आता इलेक्ट्रिक रिक्षाही धावताना दिसणार आहे. आजघडीला प्रवासी वाहतुकीच्या १० इलेक्ट्रिक रिक्षा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत, तर मालवाहतूक करणाऱ्या ११६ ई-रिक्षा धावत आहेत.
इंधनाच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षांत ई-वाहनांची संकल्पना आता सर्वसामान्यांमध्ये हळूहळू रुजत आहे. औरंगाबादकरही ई-वाहनांकडे वळत असल्याचे गेल्या काही महिन्यांत भर पडलेल्या ई-वाहनांच्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे; परंतु आता केवळ ई-दुचाकी, चारचाकीच नव्हे, तर ई-रिक्षाही रस्त्यावर उतरत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्येही ई-रिक्षा दाखल होत आहे.
ई-रिक्षा किती प्रवासी नेऊ शकते?इंधनावरील अनेक रिक्षांमधून प्रवाशांना अक्षरश: कोंबून वाहतूक होताना दिसते. अशा परिस्थितीत ई-रिक्षा किती प्रवाशांना घेऊन जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जितके जास्त प्रवासी, तितके अधिक पैसे, असा रिक्षाचालकांचा हिशेब असतो. परंतु, ई-रिक्षामधूनही नियमाप्रमाणे तीनच प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. ई-रिक्षाच्या क्षमतेप्रमाणे अधिक प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल; परंतु नियमाला धरून नाही.
उत्पन्नासाठी ठरू शकते लाभदायकपेट्रोलचे दर १११ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दुचाकी, चारचाकींबरोबर रिक्षाचालकांनाही इंधनाच्या वाढत्या दरामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. प्रवासी वाहतूक करताना इंधनाचेही पैसे निघत नाही, अशी ओरड होते. अशा परिस्थिती ई-रिक्षाचालकांसाठी उत्पन्न देणारी ठरू शकते, अशी आशा व्यक्त होत आहे.
इंधन दरवाढीत मिळू शकतो दिलासाइंधन दरवाढीमुळे रिक्षा चालविणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत ई-रिक्षा फायद्याची ठरू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ८० कि.मी.पर्यंत ही रिक्षा धावत असल्याचे सांगितले जाते. कंपन्यांनुसार त्यात कमी-अधिक प्रमाण असू शकते.- शेख अकील, उपाध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ
तीन प्रवासी वाहतुकीची परवानगीआरटीओ कार्यालयात ई-दुचाकी, चारचाकीबरोबर ई-रिक्षांचीही नोंदणी होत आहे. या ई-रिक्षांमधून तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
औरंगाबादेतील ई-वाहनांची संख्या- दुचाकी-१३३४- चारचाकी-९९- बस-२- प्रवासी रिक्षा-१०- मालवाहू रिक्षा-११६