तुळजापूर : एका महिला भाविकाला मोरपंखी काट असलेली साडीचोळी दिल्याचे सांगत तिला केवळ हिरवे कापड देवून फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शुक्रवारी सकाळी तुळजापूर शहरात घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता़पैठण) येथील मंगलबाई रमेश बाराहाते या शुक्रवारी सकाळी तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या़ देवीला साडीचोळी म्हणून त्यांनी शहरातील अंबिका साडी सेंटरमधून हिरव्या रंगाची साडी जिला मोरपंखी जरीचा काट दिसत होता़ प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग केलेली ती साडी त्यांनी १५० रूपयांना खरेदी केली़ मात्र, ती पॅकिंग काढल्यानंतर आतमध्ये केवळ हिरवे कापड दिसून आले़ त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची फिर्याद मंगलबाई बारहाते यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून दुकानाचे मालक बाळासाहेब काशिनाथ शिंदे, नोकर संजय दगडू माने यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ (वार्ताहर)
साडीऐवजी दिले हिरवे कापड
By admin | Published: July 16, 2016 12:58 AM