औरंगाबाद : पर्यावरण संरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे ग्रीन ब्रिगेड ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी घरटी, त्यांच्या दाणा, पाण्याच्या सुविधेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. विभाग नियंत्रक कार्यालयापासून या उपक्रमाची सुुरुवात झाली असून, जिल्हाभरात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक वेगळीच लगबग सुरू आहे. अस्ताव्यस्त पद्धतीने उभी राहणारी वाहने, जागोजागी पसरलेली अस्वच्छता हे सगळे चित्र आता बदलत आहे. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यालयाचा परिसर ग्रीन झोन आणि पर्यावरण पूरक म्हणून विकसित केला जात आहे. या ठिकाणी छोटे उद्यान साकारण्यात येत असून विविध प्रकारची रोपे लावली जात आहेत. सध्या असलेल्या मोठ्या झाडांवर पक्ष्यांसाठी घरटी बांधण्यात आली आहेत. या घरट्यांमध्ये पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी यापुढे अधिकारी-कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत.
वृक्षारोपणानंतर अधिकारी-कर्मचारी झाडे दत्तकदेखील घेणार आहेत. या सगळ्या उपक्रमासाठी एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ग्रीन ब्रिगेड तयार क रण्यात आली आहे. शासनाच्या हरित सेनेसह ग्रीन ब्रिगेड म्हणून अधिकारी-कर्मचारी काम करणार आहेत.एसटी महामंडळाला यंदा जिल्हाभरातील आगारांत ६ हजार ८०० झाडे लावण्याचे लक्ष्य आहे; परंतु या लक्ष्यापेक्षा अधिक झाडे लावण्याची तयारी करण्यात आली आहे. केवळ झाडे लावून मोकळे होण्यासाठी त्यांच्या संवर्धनासाठी ग्रीन ब्रिगेड प्रयत्नशील राहणार आहेत.
कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभागअधिकारी-कर्मचाऱ्यांची ग्रीन ब्रिगेड तयार क रण्यात आली आहे. यामध्ये कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढाकार घेतला आहे.- प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ