विटखेडा वाॅर्डात शिवजयंती उत्साहात
औरंगाबाद : विटखेडा वाॅर्डात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाॅर्डातील लहान मुलींच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन-आरती करण्यात आली. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या वतीने सकाळी मिठाई वाटप तसेच सायंकाळी राम मंदिरात वाॅर्डातील समस्त रहिवाशांकरिता भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, संजय खडके, भगवान गायकवाड, विक्रम खडके, सिद्धार्थ घोडेले, गौतम सोनवणे, राजू बनकर, बाबासाहेब खडके यांच्यासह वाॅर्डातील रहिवाशांची उपस्थिती होती.
किलेअर्क येथील काम संथगतीने
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १५२ कोटी रुपयांच्या निधीतून सिटीचाैक ते नाैबत दरवाजापर्यंत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. ओव्हरब्रिजचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. महापालिकेकडून या भागातील अतिक्रमणे काढलेली नाहीत. त्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक काम रखडले आहे.
औरंगपुरा येथील रस्त्याच्या कामात मातीचा वापर
औरंगाबाद : औरंगपुरा भाजीमंडई ते बारूदगर नाला येथील रस्त्याच्या कामात मोठे खोदकाम करण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून या ठिकाणी मातीचा वापर सुरू असल्यामुळे नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे कंत्राटदाराला माती उचलून न्यावी लागली. आता मातीच्या ऐवजी मुरुमाचा वापर करण्यात येत आहे.