औरंगाबाद : सुखना नदीपात्राने ( Sukhana river flood ) शनिवारी पहाटे रौद्ररूप धारण केल्याने नारेगाव परिसरातील किमान दोन हजार कुटुंबांना पुराचा तडाखा बसला. अनेकांचे संसारच उघड्यावर आले. कालपासून कोणाच्याही घरात चूल पेटली नाही. आसपासच्या नागरिकांनी जे दिले, त्यावरच पोटाची खळगी भरली. शासकीय यंत्रणांकडून कोणतीही मदत नाही. माणिकनगर, पटेलनगर, आनंद गाडेनगर, अझीझ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनीतील रहिवाशांच्या वेदना कायम आहेत. ( The grief of two thousand families in Naregaon, the flood of tears will not stop)
सावंगी तलावासह पंचक्रोशील छोटे-छोटे तलाव, ओढ्याचे पाणी सुखना नदीपात्राला येऊन मिळते. शनिवारी शहर साखरझोपेत असताना विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली. कोणाला काही कळण्यापूर्वी सुखना नदीपात्राने रौद्ररूप धारण केले. सर्वांत पहिला तडाखा नारेगावमधील माणिकनगर, पटेलनगर, आनंद गाडेनगर, अझीझ कॉलनी, बिस्मिल्लाह कॉलनीमधील गोरगरिबांना बसला. अनेक घरांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचले. यात गृहोपयोगी वस्तू वाहून गेल्या. अन्न-धान्य भिजले. दीड ते दोन हजार घरांमध्ये पाणीच पाणी होते. सकाळी ११ वाजेनंतर पुराचे पाणी ओसरू लागले. परंतु, शनिवारी या भागातील घरांमध्ये चूल पेटली नाही. आसपासच्या अनेक नागरिकांनी भात शिजवून आणून दिला. रविवारीही अनेक घरांमध्ये चिखलच चिखल होता. लोकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.
चिकलठाण्यात दोन पूल, भिंत पडल्याचिकलठाण्यात आठवडी बाजार येथील पूल वाहून गेला. त्यामुळे महालप्रिंप्रीकडे ये-जा करणारी वाहतूक बंद झाली. दोन घरांच्या भिंती कोसळल्या. पुराचे पाणी एक ते दोन फुटांपर्यंत घरात शिरल्याने घरात गाळ भरला. स्मशानभूमीच्या भिंती काेसळल्या. स्मशानभूमीकडे जाणारा पूलही खचला.
राजकीय नेत्यांचे पर्यटनआ. अंबादास दानवे यांनी रविवारी नारेगाव भागाला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे आ. हरिभाऊ बागडे यांनी चिकलठाणा येथील आठवडी बाजाराच्या पुलाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित करायला लावतो, मनपा प्रशासनाकडून खचलेले पूल पुन्हा बांधून घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.