औरंगाबाद : मुलीच्या लग्नपूर्व समारंभात (सीमंत पूजन) व्यस्त वधूच्या आईजवळील १३ लाख ४६ हजार ६९८ रुपये किमतीची सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळविली. ही घटना बीड बायपासवरील एका लॉनवर २५ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात २७ डिसेंबर रोजी तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील सारंग हौसिंग सोसायटीतील डॉ. जयंत तुपकरी आणि डॉ. ज्योती तुपकरी यांच्या मुलीचा विवाह सोहळा २५ डिसेंबर रोजी बीड बायपासवरील गुरू लॉन्स येथे आयोजित केला होता. वधू माता डॉ. ज्योती यांच्याकडे ब्राऊन रंगाच्या पर्समध्ये मोबाईल, रोख ५० हजार रुपये, प्रत्येकी २०१ रुपये असलेली सुमारे ९८ बंद पाकिटे, ८ तोळ्याचा राणीहार, सोन्याचे दागिने, दहा तोळ्याचे मंगळसूत्र, सहा तोळ्याच्या पाच अंगठ्या, दोन तोळ्याचे खड्याचे पेडंट असे एकूण ४२ तोळ्याचे दागिने, चांदीच्या भेटवस्तू असा सुमारे १२ लाख ४६ हजार ६९८ रुपये किमतीचा ऐवज होता.
ही पर्स सोबत ठेवून डॉ. ज्योती यांनी पाहुण्यांसोबत छायाचित्रेही काढली, जेवण केले. दरम्यानच्या काळात त्यांची नजर चुकवून चोरट्यांनी ही पर्स पळविली. रात्री ११ वाजेच्या सुमारास पर्स चोरीला गेल्याचे डॉ. तुपकरी दाम्पत्याच्या लक्षात आले. मुलीचा विवाह समारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक आर.के. बांगर तपास करीत आहेत.
सलग पाचवी घटना, तरीही चोरटे अटकेबाहेरविवाह समारंभ सुरू असताना मंगलकार्यालय आणि लॉन्समध्ये घुसून वधू-वराच्या आई-वडिलांकडील किमती बॅग, पर्स चोरीला जाण्याची ही पंधरा दिवसांतील पाचवी घटना आहे. मंगलकार्यालय, लॉन्समध्ये गर्दीत घुसून चोरटे बॅग पळवित आहेत. पाच घटनांनंतरही चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.