बीड : येथील पंचायत समितीत सत्तास्थापनेनंतर आ. विनायक मेटे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. दुसरीकडे आ. जयदत्त क्षीरसागर यांनीही गटविकास अधिकाऱ्यांसोबत विविध विकास योजनांबाबत चर्चा केली. एकाचवेळी दोन्हीकडून निमंत्रण आल्याने गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांची धावपळ उडाली.शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीला सोबत घेऊन पंचायत समितीवर शिवसंग्रामने झेंडा फडकावला. सोमवारी आ. विनायक मेटे यांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची बैठक सभागृहात आयोजित केली होती. आ. मेटे यांच्यासह सभापती मनीषा कोकाटे, उपसभापती मकरंद उबाळे, शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, याचवेळी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृहात गटविकास अधिकारी डॉ. मोकाटे यांना बोलावून घेतले. तेथे त्यांच्याशी आ. क्षीरसागर यांनी अर्धा तास चर्चा केली. यावेळी विविध योजनांच्या कामांची माहिती त्यांनी जाणून घेतली. दरम्यान, आ. क्षीरसागर यांची बैठक आटोपून डॉ. मोकाटे हे आ. विनायक मेटे यांच्या बैठकीसाठी पंचायत समितीच्या सभागृहात पोहोचले. मात्र, ‘आता बैठक संपत आली आहे... मी तुमच्याशी स्वतंत्र चर्चा करतो...’ असे आ. मेटे म्हणाले. त्यामुळे गटविकास अधिकारी मोकाटे आपल्या दालनात जाऊन बसले.,आ. मेटे यांनी खुद्द गटविकास अधिकाऱ्यांनाच बैठकीत बसू न दिल्याने सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला. अधिकारी- पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मेटे यांनी मग्रारोहयो, पाणीपुरवठा या योजनांचा आढावा घेतला. बैठक संपल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी मोकाटे यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांच्याशीही चर्चा झाली. (प्रतिनिधी)
गटविकास अधिकाऱ्यांची धावपळ
By admin | Published: March 27, 2017 11:44 PM