लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़, परंतु सलग दोन महिने कोरडे गेल्यानंतर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले़ जिल्ह्यात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली होती़ नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ ८ दलघमी साठा शिल्लक राहिला होता़ पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवली होती़ ग्रामीण भागात वाडी, वस्ती, तांड्यावर भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होती़ भूगर्भाची पाणीपातळी खालावल्यामुळे अनेकांचे बोअर व विहिरी कोरड्या झाल्या होत्या़ त्यामुळे जिल्ह्यात आॅगस्टमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ आली़ संभाव्य दुष्काळाची चाहूल लक्षात घेऊन व पुढील कालावधीत पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता़जिल्हाधिकाºयांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या परिपत्रकान्वये नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार सार्वजनिक पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतापासून १ किलोमीटर अंतरावरील धरण, विहिरी व अन्य स्त्रोताद्वारे भूजल उपशावर तात्पुरती बंदी घातली होती, परंतु या बंदीनंतर दोनच दिवसांनी १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरले़ तसेच नद्या, नाल्यांनाही पाणी आले़या पावसाने भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली़ दरम्यान, विष्णूपुरी जलाशयात ४० दिवस पुरेल एवढाच साठा उरल्याने शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली होती़ मात्र आता ही चिंता दूर झाली आहे़ काही नागरिकांनी आमच्या बोअरचे पाणी वर आल्याचे सांगितले़
भूजलपातळी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:29 AM