हणमंत गायकवाड , लातूरलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेच्या विजयाने भाजपा कार्यकर्त्यांत चैतन्य आले असून, काँग्रेसने चिंतन बैठकांवर भर देऊन कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला आहे. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला दोष देत स्वतंत्र चिंतन बैठक घेऊन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आपणच काँग्रेसचे उमेदवार असल्याचे अप्रत्यक्ष जाहीरच केले आहे. दरम्यान, त्यांना लातूर ग्रामीणमधून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढतील, अशी चर्चा मतदारांमध्ये जोरदार सुरू झाली आहे. विलासराव देशमुख यांच्या विरोधात १९९५ च्या निवडणुकीत कव्हेकर यांनी दंड थोपटले होते. जनता दलाचे तिकीट घेऊन त्यांनी या निवडणुकीत विलासरावांना पराभूत केले होते. मध्यंतरीच्या काळात ते राष्ट्रवादी, भाजपात गेले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचे सूत जुळले आणि कव्हेकर काँग्रेसवासी झाले. गत विधानसभा निवडणुकीतही त्यांनी तिकिटाचा आग्रह केला होता. परंतु, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून वैजनाथ शिंदे यांना उमेदवारी मिळाली. ते २३ हजार ५८३ च्या मताधिक्याने विजयी झाले. आता कव्हेकर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यादृष्टीनेच त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाचे खापर स्थानिक नेतृत्वावर फोडले आहे. लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र चिंतन बैठक घेऊन त्यांनी उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे. कव्हेकरांच्या या आक्रमक भूमिकेची मतदारांमध्ये चर्चा आहे. विद्यमान आमदार वैजनाथ शिंदेही इच्छुक आहेत पण; त्यांनी सर्व श्रेष्ठींवर सोपविले आहे. काँग्रेसमधून रेणा कारखान्याचे चेअरमन यशवंत पाटील, त्रिंबक भिसे, ‘मांजरा’चे चेअरमन धनंजय देशमुख यांच्या नावाचीही चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपात चैतन्य आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ८६,१३६ मते मिळविलेले रमेश कराड आताही इच्छुक आहेत. त्यांना जि.प. सदस्या ललिता हनवते यांचा थोडा अडसर असला तरी तिकिटासाठी तेवढी स्पर्धा नाही. त्यामुळेच कराडांचा मतदारसंघात संपर्क सुरू आहे.
कव्हेकरांच्या उमेदवारीबाबत ‘गट’ सक्रिय
By admin | Published: June 09, 2014 11:56 PM