लातूर : लातूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या गटसचिव-कर्मचार्यांना सुधारित वेतन श्रेणी दिली नाही. ती देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर गटसचिव संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, गटसचिवांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. लातूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेअंतर्गत कार्यरत असलेले गटसचिव-कर्मचार्यांना सुधारीत वेतनश्रेणी देण्यात आली नाही. या श्रेणीची अंमलबजावणी करण्यासंबंधी सहकारी संस्थेचा ठराव घेण्यात आला. जिल्हास्तरीय समिती लातूर यांचाही ठराव घेण्यात आला. या श्रेणीबाबत सहकार आयुक्तांचे २७ डिसेंबर २0१५ रोजी पत्र पाठवून श्रेणीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही गटसचिवांच्या सुधारित वेतनश्रेणीसंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संघटनेचे अध्यक्ष आर. एम.बिराजदार, उपाध्यक्ष डी.टी. पौळ, एस.यु.मोरे, टी.एम. शिंदे यांच्यासह संघटनेतील सदस्य मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. दरम्यान, संघटनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. |