सध्या रस्ते गर्दीने अक्षरशः फुलून गेले आहेत. टिळक पथ, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगारगल्ली, शहागंज, सिटी चौक, टीव्ही सेंटर, सिडको कॅनॉट गार्डन, उस्मानपुरा, जिन्सी, रोशन गेट, कटकट गेट, पीर बाजार, बेगमपुऱ्यासह छावणी आदी परिसरात सकाळपासूनच नागरिक गर्दी करीत आहेत. दुपारीसुद्धा गर्दी कायम असते. निर्बंध शिथिल केल्यानंतरही औरंगाबादकरांची जीवनावश्यक व इतर खरेदी अद्यापही संपलेली दिसत नाही. अनेकजण सामाजिक अंतर तर सोडाच, पण मास्क सुद्धा व्यवस्थितपणे लावत नाहीत. सणासुदीला मुख्य बाजारपेठांमध्ये जशी गर्दी होते, तशीच गर्दी सध्या शहरात होऊ लागल्याने ठिकठिकाणी बंद सिग्नल आणि बेवारस बॅरिकेट्समुळे वाहतूक कोंडी बघायला मिळते. महापालिका व पोलिसांनी वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज असली तरी, खुद्द औरंगाबादकरांनी सुद्धा आता खूपच जबाबदारीने वागायला हवे. नाही तर दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेमुळे शहर लॉक करण्याची वेळ प्रशासनावर येऊ नये, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
वाढती गर्दी ठरणार पुन्हा कोरोनाला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:04 AM