ऑनलाईन लोकमत / प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद,दि. ३ : जीएसटी (गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) लागू होऊन १ महिनापूर्ण झाला. या जीएसटीमुळे वाणिज्य शाखा व चार्टर्ड अकाऊंटंटच्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेत प्रचंड ‘भाव’ आला आहे. ज्यांना जीएसटीचे सॉफ्टवेअर हाताळण्याचा अनुभव आहे अशांना तर नोकरीसाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले जात आहे. व्यापारी महासंघाच्या आकडेवारीनुसार मागील महिनाभरात सुमारे ५ हजार अकाऊटंटला विविध वितरक,फर्म मध्ये काम मिळाले आहे. आणखी तेवढ्याच अकाऊंटंटची आवश्यकता असून अनुभवी युवकांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितल्या जात आहे.
बहुचर्चीत व बहुप्रतिक्षीत जीएसटी करप्रणाली अखेर १ जुलैपासून देशभरात लागू झाली. एक देश एक करप्रणाली हे स्वप्न यामुळे पूर्ण झाले. व्यापा-यांना जीएसटी किचकट वाटत आहे. यामुळे जीएसटीला व्यापारी वर्गातून सुरूवातीला विरोध झाला पण आता जीएसटीशिवाय व्यवसाय करणे कठीण झाल्याने अखेर व्यापाºयांनीही जीएसटीएनमध्ये नोंदणी करणे सुरु केले. ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच अकाऊंटंट होते त्यांनी आपल्याकडील कर्मचा-यांना जीएसटीचे प्रशिक्षण दिले. ज्यांच्याकडे अकाऊंटंट नव्हते त्यांनी वाणिज्य शाखेतील अंतिम वर्षातील, चार्टड अकाऊंटचा कोर्स करणारे किंवा चार्टड अकाऊंटटकडे नोकरीला असलेल्या विद्यार्थ्यांची नेमणूक करणे सुरु केले आहे. यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, मागील महिन्यात औरंगाबादेत विविध क्षेत्रातील व्यापा-यांनी सुमारे ५ हजार युवकांची अकाऊंटट म्हणून नेमणूक केली आहे. येत्या काळात तेवढ्याच अकाऊंटटची भर्ती केली जाईल. अनुभवानुसार त्यांना ५ हजार ते २० हजार रुपयांदरम्यान सुरुवातीला पगार दिला जात आहे. मुनीमजीची जागा आता या अकाऊंटटनी घेतली आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल एक ते दोन कोटीपेक्षा अधिक आहेत असे व्यापारी आपल्या प्रतिष्ठाणमध्ये अकाऊंटट नेमत आहेत.
सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी सांगितले की, व्यापारी, सीए, कॉस्ट अकाऊंटंट, टॅक्स प्रॉक्टिशनर्स, सॉफ्टवेअर कन्सल्टंट, डाटा एन्ट्री, सॉफ्टवेअर फॅकल्टी मेंबर आदी १५ क्षेत्रात अनुभवी अकाऊंटंटची आवश्यकता भासत आहे. एखाद्या वेळेस सीए मिळतील पण अकाऊंट मिळणे सध्या अवघड झाले आहे. कंपन्यांचे, बँकांचे तसेच विविध फर्मचे आॅडीट करण्यासाठी सीए लाही हाताखाली अकाऊंटटची गरज भासणार आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात ते उपलब्ध होत नाही. यामुळे वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना ‘भाव’ आला आहे.
सीएचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मागणी सीएचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना जीएसटीमुळे व्यापारी व उद्योेग क्षेत्रातून मोठी मागणी वाढली आहे. आमच्या संघटनेने यासंदर्भात नुकतेच सीएचे शिक्षण घेणाºया, सीएकडे काम करणाºया विद्यार्थ्यांसाठी जीएसटीवरील कार्यशाळा घेतली. त्यात ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना चांगली मागणी वाढली आहे. व्यापार व उद्योगक्षेत्रात अनुभवानुसार सुरुवातीला २० ते ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात आहे. सध्या बाजारपेठेत १५ हजार अकाऊंटंटची आवश्यकता आहे. येत्या काळ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असणार आहे. - रोहन आचलिया, चार्टर्ड अकाऊंटंट संघटनेची विद्यार्थी विंग प्रमुख
व्यापारी महासंघाचा विद्यापीठाशी करार जिल्हा व्यापारी महासंघाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी करार केला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना महासंघ बीकॉम, एमकॉमच्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. या विद्यार्थ्यांना जीएसटी सॉफ्टवेअरमध्ये दररोजच्या व्यवहाराची नोंदणी करण्याचा प्रत्यक्षात अनुभव देणार आहे. चांगले प्रशिक्षीत युवकांना रोजगारही दिल्या जाईल.-जन हौजवाला ,महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ.