छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीची यात्रा भरविण्यात येते. या यात्रेत दररोज लाखो भाविक देवीचे दर्शन घेतात. यात्रेत मनोरंजनाचा आनंदही घेतात. या यात्रेवरही केंद्र सरकारला जीएसटी द्यावा लागतो. यंदा यात्रेचे टेंडर जीएसटीसह ९० लाखांत गेले आहे. यात १८ टक्के जीएसटी म्हणजे १४ लाख रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत.
मराठवाड्यातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून छावणीतील कर्णपुरा यात्रेची ओळख आहे. ५ ते ६ एकर परिसरात ही यात्रा भरविली जाते. देवीच्या दर्शनाला दररोज लाखो भाविक येतात. यामुळे पूजेच्या साहित्यापासून ते आकाशपाळण्यापर्यंत येथे ८०० ते १ हजार दरम्यान लहान-मोठे व्यावसायिक सहभागी होतात. छावणी परिषदेकडे येथील जमिनीचा ताबा आहे. दरवर्षी टेंडर काढून १० दिवसांसाठी जागा भाड्याने दिली जाते. यंदा स्टॉल, खेळण्याची जागा व पार्किंगची जागा मिळून ७६ लाख २५ हजार रुपयांत टेंडर गेले. त्यावर १८ टक्के जीएसटी १३ लाख ७२ हजार ५०० रुपये म्हणजेच ८९ लाख ९७ हजार ५०० रुपये टेंडर घेणाऱ्यांना भरावे लागते. जीएसटीपोटी १४ लाख केंद्र सरकारच्या तिजोरीत तर उर्वरित रक्कम छावणी परिषदेच्या तिजोरीत जमा होणार आहे. हे टेंडर २१ सप्टेंबरला उघडण्यात आले. मागील वर्षी यात्रेचे टेंडर जीएसटीसह ८६ लाखांत गेले होते, अशी माहिती छावणी परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक वर्षा केणेकर यांनी दिली.
दुचाकी १० रुपये, चारचाकीसाठी २० रुपये पार्किंग शुल्ककर्णपुरा यात्रेतील वाहनांच्या पार्किंगचे दर करारात ठरवून दिले आहेत. चार तासांसाठी दुचाकीला १० रुपये तर चारचाकीचे २० रुपये द्यावे लागतील. मात्र, या दरानुसार पावती दिली जाते का, यावर लक्ष ठेवण्यासाठी छावणी परिषदेकडे पुरेसे कर्मचारी नाहीत.