औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहे, याचा परिणाम केंद्रीय जीएसटी कार्यालयाच्या महसुलावरही होत आहे. यंदा मराठवाडा विभागाचा कार्यालयाचा महसूल तब्बल ८ टक्क्यांनी तर नागपूर विभागाचा १० तर देशाचा ११ टक्क्यांनी घटला आहे. यात आैरंगाबाद विभागाला स्काेडा कार कंपनीकडून येणाऱ्या महसुलात २०० तर कृषी क्षेत्रातील सूक्ष्मसिंचन उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यांच्या साहित्य विक्री घटल्याने ९० लाखांचा महसूल कमी आला आहे, अशी माहित केंद्रीय जीएसटी कार्यालयाचे आयुक्त के.व्ही.एस. सिंग यांनी दिली.
येथील कार्यालयात आंतरराष्ट्रायी उत्पादन शुल्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. त्यांनी दुष्काळामुळे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलावर कसा परिणाम झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, मागच्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळ होता. त्याचा फटका यंदाच्या महसुलावर झाला. यंदाही दुष्काळ आहे. त्याचा फटका आगामी आर्थिक वर्षात दिसेल. मराठवाड्यात प्रामुख्याने औरंगाबाद शहरी विभाग आमच्यासाठी महसुलाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यात स्कोडा कंपनी ही मोठ्या संख्येत महसूल देणाऱ्या कंपनीपैकी आहे. यंदा स्काेडाकडून येणाऱ्या महसुलात २०० कोटींची घट झाली. विभागाचे वर्षाचे उद्दिष्ट्य ३२०४ कोटी आहे. परंतु डिसेंबरपर्यंत २३५८ कोटीचे उद्दिष्ट झाले. त्यापैकी २२०० रुपये वसूल झाले. यामध्ये ८ टक्क्यांनी औरंगाबाद विभागाचा महसूल घटला आहे.