औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जीटीएलच्या पन्नालालनगर येथील कार्यालयावर निदर्शने करून कंपनी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.जीटीएलने ग्राहकांकडून पैसे वसूल केले आहेत; पण ते महावितरणला भरले नाहीत. त्यात आमचा दोष काय? असा प्रश्न जीटीएलचे कर्मचारी करीत आहेत. महावितरणने कारवाई करताना कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३९३.७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यासाठी जीटीएलला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस महावितरणने दिली आहे. या दोन कंपन्यांच्या पैशांच्या वादात एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. महावितरण १६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेणार आहे. महावितरणने शहरातील वीजपुरवठा २०११ मध्ये जीटीएल ऊर्जा कंपनीकडे हस्तांतरित केला होता. या कराराची मुदत १५ वर्षांची होती; पण जीटीएलने गेल्या काही महिन्यांत महावितरणचे बिल थकविले आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस जीटीएलला दिली आहे. या नोटिसीमुळे १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. अचानक नोकरी गेल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. दोन कंपन्यांच्या अर्थकारणात १ हजार ३२ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भरडत आहेत. एका चुकीच्या निर्णयामुळे आमच्यावर कुटुंबासह उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने कारवाई करताना आमचा विचार करावा, अशा विविध प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
जीटीएलचे कर्मचारी आले ‘रस्त्यावर’ !
By admin | Published: November 14, 2014 12:44 AM