गणेश दळवी।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मला पक्षात घ्यायचं की नाही, या बाबत मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी काळजी करण्याची गरज नाही. कारण मी त्यांना विचारून पक्षात आलो नाही आणि येथून पुढेही विचारणार नाही. माझा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे हे घेतील. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आ.धोंडे यांनी विकास कामांकडे लक्ष द्यावे, आमच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात राजकीय टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी आ.धोंडेंना लगावला.आष्टीत धस यांच्या निवासस्थानी सुरेश धस गटाच्या वतीने मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार तसेच दिवाळी फराळाचा कार्यक्रम रविवारी झाला. त्यावेळी सुरेश धस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूरचे नगराध्यक्ष रोहिदास गाडे हे होते. व्यासपीठावर आष्टीचे नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, बळीराम पोटे, दशरथ वनवे, तात्यासाहेब हुले यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच उपस्थित होते.धस म्हणाले, या मतदारसंघात १६३ पैकी ८५ ग्रामपंचायतींवर धस गटाने झेंडा फडकविला आहे. परंतु मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.भिमराव धोंडे यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या ताब्यात १०३ ग्रामपंचायत असल्याचे जाहिर केले. त्याबद्दल आपल्याला काहीही घेणे देणे नाही. परंतु मी ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो वापरला व माझा भाजप प्रवेश मतदार संघातील जनता नको म्हणत असल्याचा आरोप केला होता. धोंडे साहेब, मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय तुम्हाला विचारुन घेतला नाही, घेणार नाही आणि येथून पुढेही विचारणार नाही. मला तुमच्या वकिलीची गरज नाही. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले.मला जे काही बोलायचे ते पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना बोललो आहे, असेही धस म्हणाले. मतदार संघातील कामांकडे लक्ष दिले तर काहीतरी विकास होईल, असा टोलाही त्यांनी आ.धोंडे यांना लगावला. धोंडे साहेब, तुम्ही माझ्यावर आमदार फंड वाटपात टक्केवारी घेतल्याचा आरोप केला. त्याचे उत्तर मी तुम्हाला दिलेच. परंतु तुम्ही एवढ्या दिवसात सुतगिरणी चालू करू शकले नाहीत. मात्र बांधकामासाठी दरवर्षी निधी मोठ्या प्रमाणावर घेतात. कडा साखर कारखान्याचं कुणी वाटोळं केले आहे, हे सर्व जनतेला माहित असल्याचे ते म्हणाले. प्रस्ताविक डॉ. दीपक भवर, सुत्रसंचालन माऊली जरांगे यांनी केले.
‘पक्षप्रवेशाचा निर्णय पालकमंत्री घेतील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:11 AM