लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गात संपादित होणा-या जमिनीस भाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी गेलेल्या शेतक-यांना पालकमंत्री रामदास कदम यांनी खडसावल्यानंतर आठ दिवसांत खा. चंद्रकांत खैरे यांनी शेतक-यांची बैठक घेऊन जिल्हाधिका-यांना कार्यवाही करण्याचे आदेश गुरुवारी दिले. शिवसेनेच्या गटबाजीतून शेतकरी आणि प्रशासनाची होरपळ सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले.पळशी, कान्हापूर, महालपिंप्री, कच्चीघाटी, गंगापूर तालुक्यातील फतियाबाद, तळेसमन, फतियाबाद, हडस पिंपळगाव यासह परिसरातील गावांमध्ये समृद्धी महामार्गाला देण्यात आलेल्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. अवघ्या फूटभर अंतरावर असलेल्या दोन जमिनीमध्येही लाखोंची तफावत असल्याने ही तफावत दूर करावी व भूसंपादनाचा बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी बैठकीत केली. याच जमिनीतून एकरी लाखोंचे उत्पादन मिळते. मात्र त्या तुलनेत कवडीमोल भाव भूसंपादनातून मिळतो आहे. शहराच्या जवळ असतानाही काही गावांना अत्यंत कमी दर दिल्यामुळे जमीन विक्रीचा उपयोग नसल्याचे शेतक-यांनी यावेळी सांगितले.गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री रामदास कदम यांना शेतकºयांनी भेटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अशी दादागिरी चालणार नाही, असे म्हणत त्यांनी शेतकºयांना खडसावले होते. या पार्श्वभूमीवर खा. खैरे यांनी वेळ दिल्याने यामागेही राजकारण असल्याचे चित्र दिसले.
पालकमंत्री खडसावून गेले; खासदार धावून आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:24 AM