बीड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाही लेखापरीक्षणाची मागणी केली. पारदर्शक कारभारावर भर दिला; पण घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी अप्पासाहेब गव्हाणे, दिगांबर येवले, डॉ. विजयकुमार घाडगे, विष्णू देवकते, जालिंदर पिसाळ यांची उपस्थिती होती. पंडित यांनी पत्रकार परिषदेत अडीच वर्षाच्या जि.प. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केलेल्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, अध्यक्षपदाची धुरा आली तेव्हा जि.प. अनियमितता व बेकायदेशीर बदल्या व घोटाळ्यांमुळे गाजत होती. विकासकामे राबवितानाच जि.प. ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना जि.प. चा कारभार पारदर्शक ठेवण्यावर भर दिला. मात्र, अनेक विकास योजनांत शासनाने जि.प. ला निधी दिला नाही. याउलट योजना रखडत कशा राहतील असेच धोरण ठेवले. स्मशानभूमी व दफनभूमीच्या कामांची संचिका जि.प. ने सर्व पूर्तता करुन नियोजन समितीकडे पाठविली होती; परंतु पालकमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे ही कामे होऊ शकली नाहीत. भाजपच्या कुटील राजकारणामुळे बरीच कामे करता आली नाहीत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.जि.प. च्या नूतन इमारत बांधकामास सुरुवात, बळीराजा चेतना अभियान, शिक्षकांची वाढीव ७९३ पदे, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना, आरोग्य विभागाला आकृतीबंधानुसार मिळालेल्या वाढीव जागा, जि.प. ची वेबसाईड, आयएसओ, ई- लर्निंग, डिजिटल स्कूल ही संकल्पना ही चांगली कामे करता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)
घोटाळेबाजांना पालकमंत्र्यांनी पाठिशी घातले - विजयसिंह पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 11:45 PM