छत्रपती संभाजीनगर: आज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक प्रस्तावांना मजुरी देण्यात येईल. भविष्यात हे कामे होतात किंवा नाही हे पाहणे संबंधित पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करावा मंत्रीपद हे मिरवण्यासाठी नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. ते वंदे मातरम् सभागृहात महापालिकेच्या विविध विकास योजनांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. आज सकाळी विविध विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याबाबत विकासात्मक निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली. तसेच मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, मंत्रिपदे नुसती भुषवायची नसतात. मंत्रिपदाचा फायदा घ्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठवाड्यातील मंत्र्यांना खडेबोल सुनावले.
अजित पवार पुढे म्हणाले, माझी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी योजनांचा दर आठवड्याला आढावा घेतला पाहीजे. सरकार मराठवाड्यासाठी योजना जाहीर करते. मात्र, नंतर त्या योजनांचे कामच पूर्ण होत नसल्याचे दिसते. यासाठी सरकार ज्या काही योजना जाहीर करेल, त्या योजनांचे काय झाले, याची दर आठवड्याला पालकममंत्र्यांनी माहिती घेतली पाहीजे. आढावा बैठक घेतली पाहीजे. काम कुठपर्यंत आले आहे, कुठे रखडले आहे, याची माहिती आहे. काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला पाहीजे. तेथून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. असे केले तरच योजना पूर्णत्वास जावू शकतात. तसेच सकाळी लवकर उठून कामाला लागा, लोक येतात असा सल्लाही उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्र्यांना यावेळी दिला.